निळवंडे धरण आणि कालव्याची कामे जनतेने विसरावीत यासाठी भोजपुरचा गाजावाजा

संगमनेर Live
0
निळवंडे धरण आणि कालव्याची कामे जनतेने विसरावीत यासाठी भोजपुरचा गाजावाजा

◻️ बाळासाहेब थोरात यांच्याकडून पिंपळे येथे सेवा सोसायटी लोकार्पण प्रसंगी टिका


संगमनेर LIVE | निवडणुका संपल्या की इथले राजकारण संपते अशी परंपरा आहे. आपण कधीही राजकीय भेदभाव केला नाही. सर्वाना सोबत घेतले सुरक्षित आणि सुसंस्कृत वातावरण निर्माण केले. कारखान्याच्या माध्यमातून भोजापुर चारी निर्माण करण्यात आली. दरवर्षी पाणी देण्यासाठी प्रयत्न केला. यावर्षी जास्त पाऊस झाल्याने पाणी आले. हे एका वर्षात झाले नाही. 

ज्यांचे योगदान नाही ते लोक आता बोलत आहेत. निळवंडेचे काम जनतेने विसरावे म्हणून भोजपुरचा बोलबाला केला जात अशी बोचरी टिका कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. तसेच आपण मंजूर केलेल्या उपसा जलसिंचन योजनांची स्थगिती रद्द करून तातडीने कामे सुरू करा अशी मागणी त्यांनी केली.

तालुक्यातील पिंपळे येथे विविध सहकारी सेवा सोसायटीच्या लोकार्पण प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते.

बाळासाहेब थोरात म्हणाले की, यावर्षी मे महिन्यापासून चांगला पाऊस झाला आणि त्यामुळे पाणी आले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून भोजापुर चारी निर्माण झाली. ते स्वतः भर उन्हात चारी कामावर येऊन बसायचे. भोजपूर चारी १९९२ मध्ये कारखान्याने ८२ लाख रुपये खर्च करून तयार केली. मंत्रीपदाच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळा निधी चारीसाठी आणला आणि पाणी दरवर्षी पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न आपण केले.

यावर्षी पाऊस चांगला झाला या आनंदाची गोष्ट आहे. ही चारी मागील एक वर्षात झाली नाही‌. ज्यांना कधी चारी माहीत नव्हती ते आता येऊन भाषण करत आहेत. आपण केलेली निळवंडे धरण आणि कालव्याची कामे जनतेने विसरावे म्हणून भोजापूरचा बोलबाला करत आहे. या भागाला पाणी मिळावे याकरता आपण सातत्याने प्रयत्न केला असून निळवंडे कालव्यांमधून उपसा जलसिंचन योजना मंजूर केल्या होत्या. 

यामध्ये निमोन, पळसखेडे, कऱ्हे, नान्नज दुमाला ,सोनोशी, काकडवाडी, पारेगाव बुद्रुक, पारेगाव खुर्द, तळेगाव, तिगाव, बिरेवाडी यांच्यासह ११ गावांचा समावेश आहे. महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर या मंडळीने उपसा जलसिंचन योजना रद्द केल्या. या उपसा जलसिंचन योजनेतून या भागाला पाणी देणे शक्य आहे त्यासाठी आपण नियोजन केले होते त्यामुळे तातडीने त्या सुरू कराव्यात. जे काम होईल त्याबाबत आपण नेहमी बोललो.

पश्चिमेकडून पूर्वेकडे पाणी येईल तेव्हा आनंदच आहे आणि जनता हे खूप दिवसाची ऐकत आहे. चाळीस वर्षात सातत्याने काम केले तालुका उभा केला. विकासाच्या योजना राबवल्या सुसंस्कृत आणि वैभवशाली तालुका म्हणून राज्यात ओळख निर्माण केली. सध्या शहरात व तालुक्यात अवैध धंदे वाढले आहेत येणारी पिढी उध्वस्त होते कि काय याची चिंता निर्माण झाली आहे. यामागे कोण आहे ते ओळखा. हे सर्व आपल्याला दुरुस्त करायचे असून सर्वानी शास्वत विकासाच्या पाठीशी भक्कम उभे रहा असे आवाहन केले.

दरम्यान आर्किटेक्ट बी. आर. चकोर यांनी पाणीपुरवठा योजनांसाठी केलेल्या पाठपुराव्याचा देखील यावेळी विशेष उल्लेख बाळासाहेब थोरात यांनी केला.

खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा राज्यातील अत्यंत विकसित आणि सुरक्षित तालुका म्हणून ओळखला जातो. विधानसभा निवडणुकीत जे झाले त्याची चिंता आणि काळजी संपूर्ण राज्याला पडली आहे. लोकनेता कायम हा जनतेमध्ये राहणार असतो. समोरचे लोक येतील भूलथापा देतील कारण त्यांना जनतेशी घेणे देणे नसते. आपण कायम सर्वानी एकजुटीने बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन केले.

यावेळी ॲड. माधवराव कानवडे, बी. आर. चकोर यांच्यासह विविध कार्यकर्त्यानी आपले मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र कहांडळ व अनिल घुगे यांनी केले. शिवनाथ कोटकर यांनी आभार मानले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !