आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनचं लढणार!
◻️ शिवसेना उपनेते उदय सामंत यांचा संगमनेर येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्याना कानमंत्र
संगमनेर LIVE | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढविण्याचा निर्धार आहे. मात्र, यदा कदाचित महायुती झाली नाही तर, शिवसेना पूर्ण ताकदीनिशी या निवडणुका लढवणार आहे. या निवडणुका केवळ लढायच्या नाहीत, तर जिंकायच्या सुध्दा आहेत.” त्यासाठी सर्वानी आपापसातील मतभेद दूर करून कामाला लागावे. असा सल्ला शिवसेनेचे उपनेते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिला.
आमदार अमोल खताळ यांच्या संगमनेर येथील शिवसेना महायुती जनसंपर्क कार्यालयामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आमदार अमोल खताळ, माजी आमदार भानुदास मुरकुटे, जिल्हा अध्यक्ष कमलाकर कोते, दक्षिण जिल्हा अध्यक्ष बाबुशेठ टायरवाले यांच्यासह जिल्ह्यासह तालुक्यातील प्रमुख शिवसेना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
मंत्री सामंत म्हणाले की, “प्रत्येकाने आपल्यातील मतभेद बाजूला ठेवावेत. एकमेकांतील चढाओढ थांबवावी जेणे करून आपल्यातील मतभेदांचा फायदा विरोधकांना होऊ शकतो. त्यामुळे आपली निष्ठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रति आहे. ती निष्ठा प्रत्येक शिवसैनिकाने आणि पदाधिकाऱ्यांनी जपली पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी संघटन मजबूत करा, “जनतेच्या सेवेसाठी निष्ठा, प्रामाणिकपणा आणि संघटनेवर विश्वास ठेवून झटले पाहिजे. शिवसेनेची खरी ताकद म्हणजे शिवसैनिक, आणि या शिवशक्तीच्या जोरावर महायुतीचा विजय निश्चित आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवायचा आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे सांगताना काही कानमंत्र देखील दिले आहेत.
दरम्यान आम्ही महायुती म्हणूनच जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणूक लढविणार आहोत. शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते जो आदेश देतील, त्यानुसार सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे. असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले.