माझ्या हिंदुत्वासाठी तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही - आमदार अमोल खताळ
◻️ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘त्या टिकेला’ प्रतिउत्तर
◻️ “संगमनेर हा कायद्याचा बालेकिल्ला”
संगमनेर LIVE | गेल्या काही दिवसांपासून पराभवामुळे मानसिक संतुलन बिघडलेल्या माजी लोकप्रतिनिधींनी माझ्यावर केलेल्या टीका-टिपण्यांना आता जनतेनं गांभीर्यानं घेणं सोडलं आहे. “हिंदुत्वाचा बुरखा” घालून जे आरोप माझ्यावर केले जातात, त्यातून हिंदुत्व आणि बुरखा या दोन शब्दांची सांगड घालण्याची त्यांना जास्तच घाई झाली दिसते. आमच्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही. असा टोला आमदार अमोल खताळ पाटील यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना लगावला.
बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना आमदार अमोल खताळ म्हणाले की, आमदार झाल्यापासून संगमनेर तालुक्यात हिंदू - मुस्लीम वाद न झाल्यामुळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झालेली नाही. मात्र, त्याच्या चाळीस वर्षाच्या कार्यकाळात नेहमीच दोन समाजात फूट पाडणे व द्वेष पसरवण्याचा प्रयत्न झाला. त्यांची दहशत आणि दादागिरी मोडून काढण्यासाठी तालुक्यातील जनतेने त्यांचा पराभव केला. त्यामुळे वैफल्यातून ते माझ्यावर टीका करत आहे. मात्र, मी येणाऱ्या काळात विकासाच्या माध्यमातून त्यांना नक्कीच उत्तर देईल. असे सुतोवाच आमदार अमोल खताळ यांनी केले.
अमली पदार्थ तस्करी संदर्भातील आरोपाबाबत बोलताना खताळ म्हणाले, “त्याच्या कार्यकाळात संगमनेर तालुका गुन्हेगारीचं केंद्र बनला होता. त्याबाबतची आकडेवारी आपण पोलीस ठाण्यातून मागवली आहे. त्यानीही ती माहिती मागवावी, म्हणजे सत्य जनतेसमोर येईल. गांजाचे केंद्र म्हणून संगमनेरची ओळख, अवैध कत्तलखाने, हुक्का पार्लर आणि अवैध धंद्यांना कुणाचे आशीर्वाद होते, हे जनतेला ठाऊक आहे.” असा टोला लगावला.
संगमनेरमध्ये सुरू असलेल्या अवैध धद्यांबाबत आपण विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सुद्धा प्रश्न उपस्थित केले होते. असे सांगून “संगमनेर हा कायद्याचा बालेकिल्ला आहे आणि त्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील” अशी ग्वाही दिली.