भोजापूर प्रकल्पाचा दमणगंगा वैतरणा गोदावरी नदीजोड प्रकल्पात समावेश!
◻️ मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते भोजापूर कालवा आणि पूर चारीच्या ४४ कोटी रुपये कामांचा शुभारंभ
◻️ लाभक्षेत्रातून वंचित राहीलेल्या ११ गावांचे सर्व्हेक्षणाचे आदेश
संगमनेर LIVE | भोजापूरच्या लाभक्षेत्रातून वंचित राहीलेल्या ११ गावांना पाण्याचा लाभ मिळवून देण्यासाठी तातडीने सर्व्हेक्षण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. भोजापूर प्रकल्पाचा समावेश नदीजोड प्रकल्पात करून अतिरीक्त पाणी निर्माण करण्यासाठी आरखडा तयार करण्यात असून जिरायती भागात सिंचन निर्मितीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही जलसंपदा तथा पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
भोजापूर डावा कलवा आणि पूर चारीच्या कामासाठी मजूर झालेल्या सुमारे ४४ कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमास अधिक्षक अभियंता राजेश गोवर्धने, बाळासाहेब शेटे जलसंधारण विभागाचे हरीभाऊ गीते, कार्यकारी अभियंता मोनज ढोकचौळे, तहसिलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी प्रविण सिनारे आदी उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, चाळीस वर्षात जे झाले नाही ते एक वर्षात महायुती सरकारने करून दाखवले. आमदार अमोल खताळ आणि डॉ. सुजय विखे यांनी केलेल्या पाठपुराव्याचे यश असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणुकीपुर्वी भोजापूरचे पाणी देण्याचा शब्द आपण दिला होता. यापुर्वी सारखे टॅकरने पाणी आणून टाकण्याची वेळ आली नाही. कोणत्याही कार्यकर्त्याचे जेसीबी वापरून सहकारी संस्थामधून बील काढावी लागली नाहीत असा टोला लगावून मंत्री विखे पाटील म्हणाले की, यापुर्वी निळवंडे आणि आता भोजापूर धरणातून पाणी उपलब्ध करून दिले. यंदा पाऊस चांगला झाल्याने लाभक्षेत्रातील गावांना पाणी देता आले.
परंतू या भागातील ११ गावे आशी आहेत की, त्यांना निळवंडे आणि भोजापूरच्या पाण्यापासून वंचित राहीलेल्या सोनेवाडी, पिंपळे, सोनोशी, नान्नज दुमाला, काकडवाडी, पारेगाव खुर्द आणि बुद्रुक गावांना पाणी देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. निळवंडेच्या पाण्याचा लाभ मिळावा म्हणून काही गावांची मागणी असून उपसा सिंचन योजना राबवून पाणी देता येईल का यासाठी अधिकाऱ्यांना सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
विशेष म्हणजे भोजापूर प्रकल्पाचा समावेश आता दमणगंगा वैतरणा गोदावरी नदीजोड प्रकल्पामध्ये करण्यात आला असून यासाठी १२ ते १३ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होईल. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प महायुती सरकारने केला आहे. स्व. बाळासाहेब विखे पाटील आणि गणपतराव देशमुख यांनी जे स्वप्न पाहीले होते ते पूर्ण करण्याचे काम सुरू झाले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
आमदार अमोल खताळ यांनी आपल्या भाषणात यापुर्वी निवडणुका आल्या की भोजापूर चारी आठवायची मात्र, मंत्री विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा विभागाची जबाबदारी आल्यानंतर पाण्याचा दिलासा या भागाला मिळाला. यापुर्वी चारीची काम फक्त बगलबच्चे पोसण्यासाठी होत होता. चाळीस वर्षे प्रलंबित राहीलेला प्रकल्प आपण आमदार झाल्यानंतर एक वर्षात मंत्री विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यान्वित झाला. तळेगाव, निमोण प्रमाणेच साकूर पठार भागातील पाण्याचा प्रश्न उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून सोडविला जाणार असून, तालुक्यात फक्त निधी आणण्याचे फोटो दाखवून दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. या भागातील जगदंबा माता मंदीरासाठी खरच निधी आणला का? हे देवीच्या मंदीरात येवून सांगावे असे आवाहनच त्यांनी दिले.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी केले. कार्यक्रमास किसनराव चतर, सुदामराव सानम, भीमराज चतर, श्रीकांत गोमासे, हरीष चकोर, संदीप देशमुख, विठ्ठलराव घोरपडे, राजेंद्र सोनवणे आदीसह लाभक्षेत्रातील शेतकरी महीला उपस्थित होत्या.