निझर्णेश्वर देवस्थान मंदिर परिसराचा कायापालट करणार - आमदार अमोल खताळ
◻️ कोकणगाव येथे १ कोटी १९ लाख रुपये विविध विकास कामांचा शुभारंभ
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथील निझर्णेश्वर देवस्थान विकासासाठी आणि गावातील अंतर्गत रस्त्यांसाठी तब्बल एक वर्षाच्या आत १ कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला. या निधीच्या माध्यमातून निझर्णेश्वर परिसराचा कायापालट करण्याची ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.
संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथील निझर्णेश्वर ते राष्ट्रीय महामार्ग देवस्थान रस्ता ५० लाख रुपये, जोंधळे वस्ती - कोकणगाव रस्ता २५ लाख रुपये, गावांतर्गत रस्ते १५ लाख रुपये असे एकूण एक कोटी रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन समारंभ, आमदार अमोल खताळ पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते.
आमदार खताळ पुढे म्हणाले की, मी आमदार झाल्यापासून प्रत्येक धार्मिक स्थळाचा विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मागील आठवड्यातच पर्यटन खात्यामार्फत संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील देवगड खंडोबा देवस्थानला ब वर्ग दर्जा देऊन सुमारे २ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. दोन दिवसात अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांचा विकास अंतर्गत २० ते ३० लाख रुपयांचा निधी वितरित होणार आहे.
यापूर्वी संगमनेर तालुक्यात जिरवा-जिरवीचे राजकारण झाले, पण आता महाराजांच्या कृपेने विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. महायुती सरकार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमांतून तालुक्यातील कोणतेही गाव विकासापासून वंचित राहणार नाही. वनविभागाच्या अडचणी किंवा कागद पत्रातील काही त्रुटी असेल तर, त्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मदतीने ती फाईल लवकरच क्लिअर केली जाईल. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका असेही यावेळी आमदार खताळ यांनी सांगितले.
“राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मदतीने संगमनेर तालुक्यासाठी एमआयडीसीची तत्त्वता मंजुरी मिळाली आहे. पुढील काळात तालुक्यातील युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी उद्योग उभारणीला प्रोत्साहन दिले जाणार आहे.” तसेच शहरातील कॉटेज रुग्णालयात स्वतंत्र स्त्री आणि बालरोग रुग्णालयासाठी मंजुरी प्रक्रियेत असून लवकरच ती प्रक्रिया पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.
केंद्रामध्ये नरेंद्र मोदी, राज्यात महायुतीचे सरकार आहे आणि आणि संगमनेरमध्ये आपला आमदार असताना विकास नक्कीच वेगाने होईल.” असाही विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला.
आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील व आम्ही जो कोणी महायुतीचा उमेदवार देईल त्या उमेदवाराच्या पाठीमागे सर्वानी भक्कम उभे राहावे. असे आवाहन आमदार खताळ यांनी कार्यकर्त्याना केले.
संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथील निझर्णेश्वर मंदिर प्रवेशद्वारावर असणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा एकदम जीर्ण झाला आहे. त्यामुळे तो बदलून त्या ठिकाणी पंचधातूचा महाराजाचा अश्वारूढ पुतळा उभारावा. अशी मागणी माजी सरपंच श्याम जोंधळे यांनी आमदार अमोल खताळ यांनी केली. यानंतर पालकमंत्री विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्याशी चर्चा करून तुमच्या मागणी बाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन आमदार अमोल खताळ यांनी दिले.