हिंदुत्वाचा खोटा बुरखा पांघरून तालुक्यात काळे धंदे सुरू - बाळासाहेब थोरात
◻️ ड्रग्स आणि इतर अमली पदार्थाबाबत बाळासाहेब थोरात यांचे गंभीर आरोप
संगमनेर LIVE | चाळीस वर्ष हा तालुका आपण परिवार म्हणून सांभाळला. वाईट प्रवृत्ती येऊ दिल्या नाही. मात्र आता कधी न येणारे लोक हिंदुत्वाचा खोटा बुरखा पांघरून संगमनेर मध्ये येऊ लागले आहेत. धर्माच्या नावावर काळे धंदे सुरू केले आहेत. अमली पदार्थाची तस्करी सुरू झाली आहे. या पाठीमागे कुणाचा आशीर्वाद आहे हे ओळखा ,अमली पदार्थाच्या वाढलेल्या तस्करी मागे हप्ते खोरी हे एकमेव कारण असल्याची तोफ कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी डागली आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर पार पडलेल्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, चाळीस वर्षे या तालुक्याचे प्रतिनिधित्व करताना आपण तालुका परिवार म्हणून संभाळला. कधीही वाईट प्रवृत्ती येऊ दिल्या नाही. मात्र, आता कधी न दिसणारे लोक तालुक्यात येऊ लागले आहेत. हिंदुत्वाचा खोटा बुरखा पांघून वावरत आहे. त्यांनी संगमनेर बसस्थानकासमोर कार्यक्रम घेतले. लोकांमध्ये सहभागी होत आहेत. भ्रष्टाचारांचे आरोप असलेले धर्माच्या नावावर फिरत आहेत. अमली पदार्थाची तस्करी सुरू झाली आहे .
संगमनेर मध्ये ड्रग्स, इतर अमली पदार्थ इंजेक्शन, लिक्विड या गोष्टी येऊ लागल्या आहेत. तर, सहज देखील उपलब्ध होत आहे. हे लोक शेजारील तालुक्यांमध्ये होते अनेक तालुके त्यांनी उध्वस्त केले, आता आपल्याकडे येऊ लागले आहेत. जे कधी होत नव्हते ते आता होत आहे. सुरू झालेली हप्तेखोरी हे यामधील एकमेव कारण आहे. या पाठीमागे कोण आहे. कोण संरक्षण देतो आहे. हे ओळखा अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई झाली पाहिजे. याचबरोबर त्यांच्या मागे असलेल्या शक्तींवरही कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी जोरदार मागणी केली. तर, गुन्हेगाराला जात - धर्म काही नसतो. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो. त्यामुळे तरुण पिढी उध्वस्त करणाऱ्याना आता क्षमा करु नका असे आवाहन केले.
ते म्हणाले, आपण वारकरी संप्रदायाचे आणि पुरोगामी विचारांचे पाईक आहोत. संत परंपरेचा आणि मानवतेचा विचार आपण पुढे नेला आहे. कधीही भेदभाव केला नाही. मात्र, आता हिंदुत्वाचा खोटा बुरखा पांघरलेली मंडळी तालुक्यात घुसू लागली आहे. धर्माच्या नावावर काळे धंदे करत आहेत.
काही लोकांनी सोपे राजकारण स्वीकारले आहे. काम न करता भगवी टोपी घालायची आणि फिरायचे. सध्या चाललेले सर्व चुकीचे आहे. तालुक्यातील समाज, नागरिक अस्वस्थ झाले आहे. हे सर्व तरुण पिढी उध्वस्त करणारे आहेत.
धर्माच्या नावावर गावोगावी वातावरण गढूळ झाले आहे. संगमनेर मध्ये सहा महिन्यापासून काहींचे फ्लेक्स लोंबकळत आहे. आपण आपले फ्लेक्स काढून घेतले पण काहींनी त्यावर फ्लेक्स लावून दादागिरी चालवली आहे. वेळेला त्यांना संगमनेरची ताकद दाखवावी लागणार आहे.
चाळीस वर्षात हा तालुका आपण उभा केला .गावोगावी विकासाच्या योजना राबवल्या. निळवंडे थेट पाईपलाईन योजनेतून आलेल्या पाण्यानेच टीका करणाऱ्यांनी अभ्यंग स्नान केले. हे पाणी आपण आणले त्यासाठी कष्ट केले. हा तालुका उभा केला. सर्व आपण जपले.
मात्र आता संगमनेर मधील अस्वस्थ वातावरण, वाढती अमली पदार्थाची तस्करी यामुळे तरुण पिढीचे भविष्य अत्यंत चिंतादायक असून सर्व संगमनेरकरांनी आपल्या पाल्यांबाबत अधिक सतर्क रहावे. तसेच तरुणांनी भरकटून जाऊ नये असे आवाहन केले.