सहकारी संस्थांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मदत - बाळासाहेब थोरात
◻️ ज्येष्ठ नेते थोरात यांची लेझीम पथक, पारंपारिक नृत्य, पुष्पवृष्टीसह जंगी मिरवणूक
◻️ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पाठीशी राहण्याचे आवाहन
संगमनेर LIVE | ढोल ताशांचा गजर, तरुणाईचा ओसंडून वाहणारा उत्साह, चार जेसीबींमधून केलेली पुष्पवृष्टी आणि पारंपारिक नृत्याच्या गजरात ज्येष्ठ कॉग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे पठार भागातील तरुण आणि कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.
नागरिक, महिला आणि कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत निघालेली ही भव्य मिरवणूक लक्षवेधी ठरली. याच उत्साहात, बिरेवाडी येथील सेवा सोसायटी आणि दूध उत्पादक संस्थेच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी सहकार चळवळीचे महत्त्व अधोरेखित केले, तसेच महत्त्वपूर्ण राजकीय आणि सामाजिक आवाहन केले. ते म्हणाले की, सहकारातून सर्वसामान्य नागरिकांना मोठी मदत मिळत असून, स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांनी रुजविलेले सहकारी आदर्श देशाला मार्गदर्शक ठरत आहेत.
शेतकऱ्यांसाठी केली मोठी मागणी..
राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणींवर बोट ठेवत थोरात यांनी राज्य सरकारकडे तातडीने मागणी केली. "शेतकरी अडचणीत असल्याने राज्य सरकारने निवडणुकीच्या काळात केलेल्या घोषणेनुसार आता तातडीने सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी," अशी मागणी त्यांनी केली.
'जातीचे विष पेरणाऱ्यांना वेळीच रोखा!'
राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावध राहण्याचे आवाहन केले. "आगामी निवडणुकीमध्ये काही लोक मनभेद करतील, समाजामध्ये जातीचे विष पेरतील. अशा लोकांना वेळीच रोखा," असे महत्त्वपूर्ण आवाहन त्यांनी केले.
थोरात पुढे म्हणाले की, "आपसातील सर्व मतभेद विसरून सर्वांनी तालुक्याच्या हितासाठी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी भक्कमपणे पाठीशी उभे राहावे."
चाळीस वर्षाची तपश्चर्या..
बिरेवाडीमध्ये उभ्या राहिलेल्या आदर्शवत इमारतींचे कौतुक करत थोरात म्हणाले की, या वैभवशाली इमारती गावची समृद्धी दर्शवत आहेत. गेल्या चाळीस वर्षात एकही दिवस विश्रांती न घेता आपण काम केले, अगदी परदेशात असलो तरी मतदारसंघाच्या कामांचा विचार केला. परिश्रमातूनच हा तालुका उभा राहिला. मात्र, "मागील एक वर्षापासून तालुका अस्वस्थ आहे. राजकारणाची दुरुस्ती आपल्याला सगळ्यांना करायची आहे," असे सांगत त्यांनी चांगल्या राजकीय परंपरा जपण्यासाठी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले.
दरम्यान या लोकार्पण सोहळ्यात ॲड. माधवराव कानवडे, शंकर खेमनर, अण्णासाहेब ढेंबरे, पांडुरंग ढेंबरे आदी मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. याआधी थोरात यांची पारंपरिक बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी तरुणाईने लेझीम पथकावर धरलेला ताल आणि धनगरी नृत्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.