“माणसांमध्ये राहा, आनंदी रहा म्हणजे आरोग्य सुधारेल” - डॉ. शैलेंद्रसिंह होडगर
◻️ अश्विन ग्रामीण आयुर्वेद रुग्णालयात आयोजित शिबिरात १७८ ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी!
संगमनेर LIVE | ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य जतन करण्याच्या उद्देशाने, संगमनेर तालुक्यातील मांचीहिल येथील अश्विन ग्रामीण आयुर्वेद रुग्णालाकडून वतीने आज रविवारी भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला ज्येष्ठ नागरिकांकडून अपेक्षेपेक्षा जास्त उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे एकूण १७८ नागरिकांनी या आरोग्य उपक्रमाचा लाभ घेतला.
विविध तपासण्यांचा समावेश..
रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. राजन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरात अनेक महत्त्वपूर्ण आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये रक्तदाब (BP), मधुमेह (Diabetes), हाडांची तपासणी, नेत्रतपासणी, वजन कमी करण्याचे मार्गदर्शन, अग्नीकर्म, नेत्रदर्पण, कानांचे विकार, पंचकर्म यांसारख्या सेवांसह आहारविषयक महत्त्वाचा सल्ला देण्यात आला. रुग्णालयातील अनुभवी वैद्यकीय तज्ज्ञांनी प्रत्येक नागरिकाची काळजीपूर्वक तपासणी करून त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन केले.
सक्रिय व सकारात्मक जीवनाचा संदेश..
यावेळी बोलताना, डॉ. शैलेंद्रसिंह होडगर यांनी ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय आणि सकारात्मक जीवनाचा कानमंत्र दिला. ते म्हणाले, “ज्येष्ठ नागरिकांनी नेहमी माणसांमध्ये राहावे, संवाद साधावा आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. समाजात सक्रिय राहिल्याने मानसिक समाधान आणि शारीरिक आरोग्य दोन्ही सुधारते.” असे सांगितले.
ॲड. शाळीग्राम होडगर यांनी वयाच्या ६० नंतर कुटुंबांमध्ये परमार्थिक आनंदाचे शोधण्याचे आवाहन करुन, ठराविक वयानंतर माणसाने आपली संपत्ती जोपासण्याऐवजी ती समाजाला आणि गरिबांना अधिक प्रमाणात उपयोगी कशी होईल यावर भर द्यावा असे सांगितले. तर, पैसा व संपत्ती नाशवंत आहे, ती चांगल्या मार्गी लावल्यास व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिची कीर्ती पैशांमध्ये मोजण्याऐवजी समाजोपयोगी कार्यामुळे अधिक मोठी होईल," असा मौलिक संदेश त्यांनी दिला.
ज्येष्ठ नागरिक महासंघाची उपस्थिती..
या उपक्रमासाठी संगमनेर येथील ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष, निवृत्त मुख्याध्यापक सोमनाथ कळसकर गुरुजी, श्री ज्ञानेश्वर गोंन्टे तसेच ज्येष्ठ नागरिक महासंघाचे उपाध्यक्ष, खजिनदार आणि सेक्रेटरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि या उपक्रमाचे कौतुक केले.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. अविनाश जाधव, डॉ. निशांत इंगळे, डॉ. शिवपाल खंडीझोड, डॉ. अंबादास काळुखे, डॉ. ज्योती खंदारे, डॉ. गिता दातीर, डॉ. सुषमा खंडीझोड, डॉ. जयश्री कोल्हे, ऑडियो तज्ज्ञ प्रभाकर वावरे, नेत्र टेक्निशियन रोहित मते, वैद्यकीय अधिकारी डॉ. शुकाचार्य वाघमोडे यांनी नागरिकांची तपासणी व औषधोपचार केले. तसेच संचालक प्रा. दत्ता शिंदे आणि परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांनी सक्रिय योगदान दिले.
दरम्यान रूग्णालय प्रशासनाने यापुढेही अशा उपक्रमांद्वारे ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा सातत्याने पोहोचविण्याचा आपला संकल्प व्यक्त केला आहे. तर, या शिबिरामुळे आरोग्याविषयी जागरूकता वाढण्यास मोठी मदत झाल्याची भावना ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली आहे.