नाशिक - पुणे रेल्वे संगमनेरमार्गेचं व्हावी यासाठी आग्रही भूमिका

संगमनेर Live
0
नाशिक - पुणे रेल्वे संगमनेरमार्गेचं व्हावी यासाठी आग्रही भूमिका

​◻️ आमदार अमोल खताळ यांच्याकडून वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्याची ग्वाही 

​संगमनेर LIVE | नाशिक - पुणे रेल्वेमार्ग संगमनेर शहरातूनच व्हावा, ही माझी सुरुवातीपासूनची ठाम भूमिका आहे आणि यासाठीचा पाठपुरावा मी कधीच थांबवलेला नाही, असे स्पष्ट मत आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केले.

संगमनेरच्या सर्वागीण विकासासाठी, भविष्यातील वाहतूक - सुविधांसाठी आणि उद्याच्या पिढ्यांसाठी संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने हा अत्यंत निर्णायक विषय आहे. त्यामुळे या मुद्द्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे संगमनेरच्या भवितव्याशी तडजोड करण्यासारखे आहे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

​अलीकडे प्रकल्पासंदर्भात GMRT च्या तांत्रिक कारणांचा मुद्दा पुढे आला असला, तरी त्या कारणांचा संगमनेरवर होणारा प्रत्यक्ष परिणाम सरकारलादेखील जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून संपूर्ण प्रक्रिया पुन्हा तपासली जावी, यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे. या निर्णयाचा संगमनेरच्या विकासावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याने हा प्रश्न मी अत्यंत जबाबदारीने पुढे नेत आहे, असे आमदार खताळ यांनी स्पष्ट केले.

​आमदार खताळ म्हणाले की, संगमनेरच्या जनतेच्या अपेक्षा योग्य दिशेने पूर्ण होत नसतील, तर त्यांच्या पाठीशी न्याय मिळवून देणे हे माझे कर्तव्य आहे. रेल्वेमार्गाबाबतचा मुद्दा हा कोणाच्या विरोधाचा किंवा कोणाच्या बाजूने उभे राहण्याचा विषय नाही, तर हा संपूर्ण संगमनेरच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेला संघर्ष आहे. आणि या संघर्षात मी निगर्वीपणे, सातत्याने आणि ठामपणे माझ्या संगमनेरच्या जनतेसोबत उभा राहीन.

“कोण काम करतो आणि कोण फक्त श्रेय घेतो, हे जनतेला चांगलेच कळते," अशी प्रतिक्रिया देत त्यांनी श्रेय घेणाऱ्यांवर सडेतोड टीका केली. आमदार खताळ यांनी नमूद केले की, मी या प्रकल्पाबाबत सातत्याने पाठपुरावा करत आलो आहे. केंद्र-राज्य पातळीवरील बैठका, तांत्रिक तपासण्या आणि मागण्या या सर्व पातळ्यांवरून मी संगमनेरचा मुद्दा अत्यंत ताकदीने मांडला आहे.

अलिकडे काही व्यक्ती, ज्यांचे या रेल्वे प्रकल्पासाठी प्रत्यक्ष योगदान नसतानाही सोशल मीडियावर विविध पत्रे व्हायरल करून ही कामे आमच्यामुळेच झाली असे खोटे भासवण्याचा प्रयत्न करीत आहेत. लोकांना दिशाभूल करण्यासाठी श्रेयासाठी धडपडणारा हा दिखाऊ कार्यक्रम सुरू आहे. मात्र, संगमनेरची जनता सुज्ञ आहे. प्रामाणिकपणे आणि सातत्याने काम करणाऱ्यांना जनता ओळखते. संगमनेरकरांचा न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठीचा आमचा लढा पुढेही न थांबता सुरूच राहील." असे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.

तसेच ते म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत आम्ही हार मानणार नाही. हा प्रकल्प संगमनेर मार्गे होणे गरजे आहे, कारण हा फक्त रेल्वेमार्ग नाही, तो संगमनेरच्या भविष्यातील प्रगतीचा महामार्ग आहे. असे ठामपणे सांगितले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !