संगमनेरच्या दोन तरुणांचा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते सत्कार
◻️ जिद्द आणि कष्टाच्या जोरावर तालुक्याचा वाढवला मान; इतर युवकांसाठी प्रेरणास्थान
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्याचा गौरव वाढवणाऱ्या दोन कर्तृत्ववान युवकांचा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. देशसेवा आणि क्रीडा क्षेत्रात उत्तुंग यश मिळवत आपल्या जिद्दीची, कष्टाची आणि स्वप्नपूर्तीची ताकद दाखवणाऱ्या या दोन्ही तरुणांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
सैन्य दलातील प्रलय कुरकुटे यांचा विशेष गौरव
तालुक्यातील कुरकुटवाडी येथील प्रलय राजेंद्र कुरकुटे यांनी भारतीय सैन्य दलाचे कठोर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे. राष्ट्रसेवेची शपथ घेतलेल्या या भूमिपुत्राची गुजरातमधील जामनेर येथे नियुक्ती झाली आहे. देशरक्षणासाठी सज्ज झालेल्या प्रलय कुरकुटे यांचा आमदार खताळ यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत त्यांच्या योगदानाला सलाम केला.
पोलिस दलातील अनिकेत आंधळे यांची क्रिकेट संघात निवड
याचवेळी बोटा गावातील अनिकेत अशोक आंधळे, जो सध्या महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत आहे, त्याची महाराष्ट्र राज्य २५ वर्षाखालील क्रिकेट संघात (Under-25) निवड झाली आहे. आपले कर्तव्य निभावतानाच क्रीडा क्षेत्रातही एवढे मोठे यश मिळवणाऱ्या अनिकेतची कामगिरी अत्यंत प्रशंसनीय असल्याचे मत आमदार खताळ यांनी व्यक्त केले.
मतदारसंघ नसतानाही कौतुकाची थाप
विशेष म्हणजे, या तरुणांनी मिळवलेल्या यशाची नोंद घेत आमदार खताळ यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि त्यांचा गौरव केला. हे दोन्ही तरुण त्यांच्या मतदारसंघात नसतानाही, फक्त त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांची दखल घेऊन आमदार खताळ यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. यामुळे तालुक्यात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
‘त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा' - आमदार खताळ
यावेळी बोलताना आमदार अमोल खताळ म्हणाले, “बोटा व कुरकुटवाडी या दोन्ही गावातील युवकांनी मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर संगमनेर तालुक्याचे नाव राज्यभर उज्वल केले आहे. त्यांचा आदर्श इतर युवकांनी घेणे अत्यंत गरजेचे आहे. जिद्दीच्या जोरावर कोणतीच गोष्ट अशक्य नाही, हे खऱ्या अर्थाने या दोन्ही तरूणांनी करून दाखवले असल्याने आपल्या सर्वासाठी ही कौतुकाची बाब आहे.”
दरम्यान संगमनेरच्या या दोन तेजस्वी तरुणांनी दाखवलेल्या कर्तृत्वामुळे तालुक्याचा गौरव वाढला असून त्यांच्या पुढील प्रवासासाठी सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.