डॉ. आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि भव्य ‘संविधान स्मारक’ उभे करणार

संगमनेर Live
0
डॉ. आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि भव्य ‘संविधान स्मारक’ उभे करणार

◻️ आमदार सत्यजीत तांबे यांचे महामानवाला अभिवादन

◻️ समतेचा हक्क देणारी राज्यघटना ही देशाची मोठी देण; डॉ. बाबासाहेबांचे कार्य भावी पिढ्यांना प्रेरणादायी 

संगमनेर LIVE |  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संगमनेर शहरात त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार सत्यजीत तांबे यांनी एका महत्त्वपूर्ण स्मारकाची घोषणा केली, ज्यामुळे संगमनेर शहराच्या वैभवात भर पडणार आहे.

​भव्य स्मारकाची उभारणी

​लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व भव्य 'संविधान स्मारक' उभे करणार असल्याची घोषणा आमदार सत्यजीत तांबे यांनी केली. महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.

​आमदार तांबे पुढे म्हणाले, "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला समतेचा हक्क देणारी राज्यघटना दिली. ही राज्यघटना देशासाठी सर्वात मोठी देणगी आहे. या संविधानाच्या बळावरच भारत देश वैभवशाली वाटचाल करत शतकाकडे मार्गस्थ होत आहे." या महापुरुषांचे जीवन आणि कार्य पुढील पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहील, असेही त्यांनी नमूद केले.

​डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासोबतच याच ठिकाणी शंभर फुटी तिरंगा झेंडा उभारला जाईल. याव्यतिरिक्त, संगमनेर बस स्थानकासमोर हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार असल्याची माहितीही आमदार तांबे यांनी यावेळी दिली.

​समतेचा विचार आणि राज्यघटनेचे विचार जपण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहावे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

​यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रज्ञ, कायदेतज्ज्ञ, विचारवंत आणि इतिहासाचे गाढे अभ्यासक होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी सातत्याने अभ्यास करून आपल्या ज्ञानातून जगापुढे आदर्श निर्माण केला.” त्यांनी रायगडच्या पायथ्याशी महाड येथे मनुस्मृतीचे दहन करून सर्वाना समतेचा विचार दिला आणि भारताला लोकशाही व संविधान दिले, असे डॉ. तांबे यांनी सांगितले.

​महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारावरील पुतळा येथे व्हा. चेअरमन पांडुरंग घुले, सर्व संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी अभिवादन केले. तसेच, यशोधन जनसंपर्क कार्यालय येथे काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिवादन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना वंदन केले. याप्रसंगी प्रा. बाबा खरात यांनी प्रबोधनपर गीते सादर केली.

​यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, प्रा. बाबा खरात, प्रा. हिरालाल पगडाल, बाळासाहेब गायकवाड, राजू खरात, ॲड. सुहास आहेर, तात्याराम कुटे, प्रवीण गायकवाड, प्रकाश पारखे यांच्यासह शहरातील व तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !