संगमनेर नगरपरिषद प्रशासनाला महायुतीचा ‘अल्टिमेटम’
◻️ मागण्या मान्य न झाल्यास महायुती स्टाईलने आंदोलनांचा इशारा!
◻️ ‘पाणी द्या, दिवे लावा, कचरा हटवा!’ अन्यथा ‘रास्ता रोको’
संगमनेर LIVE | शहरातील मूलभूत सोयीसुविधांच्या दुरवस्थेवरून आता संगमनेरमध्ये राजकीय वातावरण तापू लागले आहे. शहरात होणारा कमी दाबाचा पाणीपुरवठा, बंद पडलेले पथदिवे आणि कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा या प्रश्नांवरून महायुतीच्या वतीने नगरपरिषद प्रशासनाला तीव्र इशारा देण्यात आला आहे. मागण्या मान्य न झाल्यास 'शिवसेना महायुती' स्टाईलने आंदोलन आणि रास्ता रोको करण्याचा पवित्रा पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले की, निळवंडे धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा होत असतानाही, शहरातील सर्वच प्रभागांमध्ये नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळत आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील बहुतांश भागांतील पथदिवे बंद अवस्थेत असल्याने रात्रीच्या वेळी असुरक्षिततेचे वातावरण आहे. वारंवार तक्रारी करूनही दुरुस्ती केली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच उपनगरांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले असून, कचरा उचलण्याची यंत्रणा पूर्णतः कोलमडली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
“प्रशासनाने नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नये. वारंवार निवेदने देऊनही जर जीवनावश्यक प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असेल, तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल. या आंदोलनाची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील.” असा इशारा महायुतीचे पदाधिकारी यांनी दिला आहे.
नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देताना शिवसेनेचे शहरप्रमुख दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी, भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे, विद्यमान शिवसेना नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर कर्पे, आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार यांच्यासह अभिजीत पुंड, प्रकाश राठी, राहुल भोईर, मुकेश मुर्तडक, प्रवीण दिड्डी, शशांक नामन, सागर भोईर, वरद बागुल, अक्षय वर्पे, उमेश ढोले, लाला दायमा, भारत गवळी, सपना जाधव, संगीता पुंड, पूनम अनाप, पूनम दायमा, विकास पुंड, दिलीप रावळ यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी महायुतीचे पदाधिकाऱ्यांनी सर्व प्रभागांत पुरेशा दाबाने आणि नियमित पाणीपुरवठा करावा, बंद असलेले पथदिवे ‘युद्धपातळीवर’ दुरुस्त करावेत आणि शहरातील साचलेला कचरा त्वरित उचलून शहर स्वच्छ करावे, अशी मागणी केली आहे.
दरम्यान प्रशासक राज संपून नवीन लोकप्रतिनिधी निवडून आले असतानाही कामात सुधारणा का होत नाही, असा संतप्त सवाल महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी विचारला आहे.