संगमनेरमध्ये विजयाला गालबोट! दोन नगरसेवकांसह २५ जणांवर गुन्हे दाखल
◻️ सत्तेच्या पहिल्याच दिवशी नुतन नगरसेवकाकडून दहशतीचा डोस?
◻️ सुसंस्कृत संगमनेरचा गवगवा जमीनदोस्त
संगमनेर LIVE | संगमनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शहरात आनंदाऐवजी दहशतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. विजयी मिरवणुकांदरम्यान झालेल्या वादातून दोन स्वतंत्र घटनांमध्ये नवनिर्वाचित नगरसेवकांनी कायदा हातात घेतल्याचे समोर आले आहे. भारतनगर आणि इंदिरानगर भागात झालेल्या या मारहाण प्रकरणांमुळे शहर हादरले असून, पोलिसांनी दोन नगरसेवकांसह एकूण २५ जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
भारतनगरमध्ये झालेल्या घटनेतभारतनगर परिसरात विजयी मिरवणूक सुरू असताना नवनिर्वाचित नगरसेवक नुरू महंमद शेख यांच्या समर्थकांनी एका रिक्षाचालकाच्या कुटुंबावर लोखंडी रॉड, बेसबॉल बॅट आणि चॉपरने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास नगरसेवक नुरमहमंद शेख यांची मिरवणूक मुजीब शामुद्दीन शेख यांच्या घरासमोर आली. यावेळी “इनको बाहर खिचो, और मारो” अशा घोषणा देत जमावाने घरात घुसून मुजीब शेख यांच्यासह कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण केली.
या हल्ल्यात मुजीब शेख गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान पोलिसांनी नगरसेवक नुरू महंमद शेख यांच्यासह एकूण १७ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
दुसरी घटनेत इंदिरानगर गल्ली नंबर ९ मध्ये घडली. विजयाचा गुलाल साफ करण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण केल्याच्या कारणावरून नूतन नगरसेविका वनिता गाडे आणि त्यांच्या समर्थकांनी एका किराणा दुकानदार कुटुंबाला मारहाण केली. मिरवणुकीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात गुलाल आणि कचरा साचला होता. रस्ता अस्वच्छ झाल्याने स्थानिक रहिवासी यशोदा अभंग यांनी अग्निशामक दलाला बोलावून रस्ता धुवून घेतला.
“अग्निशामक दल कोणी बोलावले?” असा जाब विचारत नगरसेविका वनिता गाडे, त्यांचे पती संजय गाडे आणि मुलगा शिवराज गाडे यांनी यशोदा अभंग आणि त्यांचा मुलगा अनिकेत यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच घरातील साहित्याची तोडफोड करत जिवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान गुन्हा दाखल होऊ नये म्हणून अनेक राजकीय नेत्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन अभंग परिवाराची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र यशोदा अभंग आपल्या तक्रारीवर ठाम राहिल्या. अखेर ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
या दोन्ही घटनांनंतर संगमनेर शहर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे आणि त्यांचे पथक या प्रकरणांचा अधिक तपास करत आहेत. मिरवणुकांमध्ये अशा प्रकारे कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान जनतेने दिलेला कौल हा शहराच्या विकासासाठी असतो, दहशतीसाठी नाही. मात्र, संगमनेरमधील या दोन्ही घटनांनी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींच्या वागण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तर, सत्तेच्या पहिल्याच दिवशी नुतन नगरसेवकांनी दहशतीचा डोस? दिल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.