अपयशाने खचू नका, यशाचे शिखर नक्की गाठाल - आमदार अमोल खताळ
◻️ डॉ. संजय मालपणी यांनी आमदार खताळ यांच्या संवेदनशीलतेचे सांगितले उदाहरण
◻️ संगमनेर कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
संगमनेर LIVE | “माझ्या राजकीय प्रवासात मी अनेकदा चढ-उतार पाहिले. एका निवडणुकीत यश मिळाले तर दुसऱ्यात अपयशाचा सामना करावा लागला. मात्र, मी कधीच थांबलो नाही. विद्यार्थ्यानीही हेच लक्षात ठेवावे; अपयशाने खचून न जाता सातत्याने प्रयत्न करत राहा, यश तुम्हाला नक्कीच गवसणी घालेल,” असे प्रेरणादायी सल्ला आमदार अमोल खताळ यांनी दिला.
शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात आमदार अमोल खताळ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपणी होते.
मातृसंस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ते म्हणाले, “ज्या महाविद्यालयात मी स्वतः शिकलो, तिथेच आज प्रमुख पाहुणे म्हणून येणे हे माझे भाग्य आहे. माझे वडीलही याच महाविद्यालयाचे विद्यार्थी होते आणि त्यांनी ‘कमवा व शिका’ योजनेतून आपले शिक्षण पूर्ण केले,” अशा शब्दांत आमदार खताळ यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.
शिक्षकांबद्दल बोलताना ते म्हणाले, “खऱ्या अर्थाने विद्यार्थ्याचे भविष्य घडवण्याची जबाबदारी शिक्षकांची असते आणि या संस्थेच्या शिक्षकांनी ती चोख बजावली आहे,” असे त्यांनी नमूद केले.
समाजसेवेच्या आठवणीला उजाळा देताना ते म्हणाले, “संगमनेरमध्ये इंटरनेट नसताना सायबर कॅफेच्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालकांना मदत करतानाच आपल्याला समाजसेवेची दिशा मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हा, पण आपल्या आई-वडिलांच्या डोळ्यांतील स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहा, असे आवाहन आमदार खताळ यांनी विद्यार्थ्याना केले.
आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्याला मदतीचा हात
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संजय मालपणी यांनी आमदार खताळ यांच्या संवेदनशीलतेचे एक उदाहरण दिले. मिर्झापूर येथील अखिलेश वलवे या विद्यार्थ्याची इंग्लंडमधील शिक्षणासाठी निवड झाली होती, मात्र आर्थिक परिस्थितीमुळे त्याची शिष्यवृत्ती रखडली होती. ही बाब निदर्शनास येताच आमदार खताळ यांनी स्वतः मंत्रालयात पाठपुरावा करून त्याची शिष्यवृत्ती मंजूर करून दिली. या कृतीमुळे संगमनेरच्या एका विद्यार्थ्याचा परदेशातील शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला, जो तालुक्यासाठी अभिमानाचा विषय असल्याचे सांगितले.