१ जानेवारीपासून संगमनेरमध्ये क्रिकेटचा रणसंग्राम!
◻️ २६ व्या राज्यस्तरीय ‘सहकारमहर्षी टी-२०’ स्पर्धेचे लोकनेते बाळासाहेब थोरात करणार उध्दघाटन
◻️ आयोजक आमदार सत्यजीत तांबे यांची माहिती
संगमनेर LIVE | महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, संगमनेरच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा रोवणारी ‘राज्यस्तरीय सहकारमहर्षी टी-२० क्रिकेट स्पर्धा’ यावर्षी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. गुरुवार, १ जानेवारी २०२६ ते १७ जानेवारी २०२६ या कालावधीत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात हा भव्य क्रीडा सोहळा रंगणार असल्याची माहिती मुख्य आयोजक आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली आहे.
या स्पर्धेचे हे २६ वे वर्ष असून आयोजनामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे निकष पाळण्यात आले आहेत. एकूण ३२ नामांकित संघांना या स्पर्धेत प्रवेश देण्यात आला असून सर्व सामने ‘नॉक-आऊट’ पद्धतीने खेळवले जाणार आहेत. खेळाडूंना जागतिक दर्जाचा अनुभव मिळावा यासाठी मैदानावर ‘लश ग्रीन’ हिरवळ आणि अद्ययावत ‘टर्फ विकेट’ तयार करण्यात आली आहे. संपूर्ण स्पर्धेचे युट्युबवर थेट प्रक्षेपण केले जाणार असून ‘क्रिक हिरोज’वर डिजिटल स्कोअरिंगची सुविधा उपलब्ध असेल. सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघासाठी आकर्षक ड्रेस कोड देण्यात आला असून, १०० किलोमीटरपेक्षा लांबून येणाऱ्या संघांसाठी निवास, भोजन व नाश्त्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेतील सामन्यांचे नियंत्रण एमसीए (MCA) मान्यताप्राप्त अनुभवी पंचांमार्फत केले जाणार आहे.
या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आकर्षण वाढवण्यासाठी आयोजकांनी भरघोस बक्षिसांची घोषणा केली आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला ३ लाख रुपये आणि उपविजेत्या संघाला २ लाख रुपयांचे भव्य पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे, याशिवाय उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसाठी वैयक्तिक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत.
आमदार सत्यजीत तांबे यांनी सांगितले की, या स्पर्धेत आयपीएल (IPL) आणि राज्य पातळीवर चमकलेल्या अनेक नामवंत खेळाडूंचा सहभाग असणार आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना उच्च दर्जाचा क्रिकेट खेळ पाहायला मिळेल. गतवर्षी भारताचे माजी कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी उपस्थिती लावली होती, त्याच धर्तीवर यावर्षी देखील मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि प्रसिद्ध क्रिकेटपटूंची मांदियाळी अनुभवता येणार आहे.
गुरुवार, १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात आणि अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलाने कात टाकली असून संपूर्ण मैदानावर हिरवळीचा गालिचा (लॉन) पसरवण्यात आला आहे. प्रेक्षकांसाठी सुसज्ज स्टँड्स तयार आहेत. राज्यभरातील खेळाडू संगमनेरमध्ये दाखल झाले असून त्यांचा सराव सुरू झाला आहे.
दरम्यान संगमनेर शहर व तालुक्यातील सर्व क्रिकेट प्रेमींनी, महिलांनी आणि युवकांनी या भव्य क्रीडा महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन जयहिंद लोकचळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या वतीने करण्यात आले आहे.