शिर्डी मतदारसंघ विकासाचे ‘मॉडेल’ - धनश्रीताई विखे पाटील
◻️ लोणी खुर्दमध्ये ३० कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि उध्दघाटन
संगमनेर LIVE (लोणी) | सत्ता असो किंवा नसो, सर्वसामान्य नागरिकांशी असलेली बांधिलकी विखे पाटील परिवाराने नेहमीच जपली आहे. गट-तटाचे राजकारण बाजूला सारून विकास कामांचा डोंगर उभा केल्यामुळेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी मतदारसंघ आज राज्यात विकासाचे एक 'मॉडेल' म्हणून ओळखला जातो. असे प्रतिपादन रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. धनश्रीताई विखे यांनी केले.
राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथे तब्बल ३० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सौ. धनश्रीताई विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले, त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
नागरिकांशी संवाद साधताना सौ. विखे म्हणाल्या की, “विखे पाटील कुटुंबाने नेहमीच ‘विकास’ हाच केंद्रबिंदू मानून काम केले आहे. सरकारच्या विविध योजना तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत पोहोचवल्यामुळे आज अहिल्यानगर जिल्हा आणि शिर्डी मतदारसंघ वैयक्तिक लाभार्थी योजनांमध्ये राज्यात आघाडीवर आहे.” असे सांगितले.
विखे पाटील परिवाराच्या माध्यमातून होणारा विकास हा केवळ भौतिक नसून तो सर्वसमावेशक आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजकारण विरहित विकासाची धुरा सांभाळली असून, सर्वाना सोबत घेऊन प्रगतीचा मार्ग सुकर केला आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बचत गटांनी मोठी झेप घेतली असून, महिला आता विविध उपक्रमांतून आत्मनिर्भर होत आहेत. तसेच, विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे लोणी खुर्द परिसरातील रस्ते, पाणी आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामांना मोठी गती मिळाली असून, जनतेच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे सौ. विखे यांनी नमूद केले.
तसेच शासन आणि विखे पाटील परिवार जनतेच्या कल्याणासाठी कायम कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करताना “सामान्य जनतेला न्याय देऊन त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणे हेच विखे पाटील कुटुंबांचे मुख्य ध्येय आहे.” असे देखील सौ. धनश्रीताई विखे यावेळी म्हणाल्या आहेत.
दरम्यान लोणी खुर्द येथील विविध प्रभागांमध्ये सुरू झालेल्या या विकास कामांमुळे गावाच्या वैभवात भर पडणार असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. तर, या सोहळ्याला लोणी खुर्द येथील विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला भगिनी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.