‘तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी उद्योग आणण्याची जबाबदारी माझी!’
◻️ नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची पिंपरणे येथील सभेत ग्वाही
◻️ आमदार अमोल खताळ विकासकामांत खोडा घालणाऱ्यांवर बरसले
संगमनेर LIVE | “जे गेल्या चाळीस वर्षांत साध्य झाले नाही, ते महायुती सरकारने अवघ्या एका वर्षात करून दाखवले आहे. तालुक्यातील तरुणांच्या रोजगारासाठी भविष्यात जमीन उपलब्ध करून द्या, तिथे उद्योग आणण्याची संपूर्ण जबाबदारी मी घेतो,” अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे सुमारे ८ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ मंत्री विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी बापूसाहेब देशमुख यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले.
तालुक्याच्या सर्वागीण विकासाचा आराखडा मांडताना मंत्री विखे पाटील यांनी औद्योगिक आणि पायाभूत सुविधांवर विशेष भर दिला. शिर्डीच्या धर्तीवर संगमनेर तालुक्यातही औद्योगिक वसाहत निर्माण करून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यासाठी जागेची उपलब्धता झाल्यास मोठे प्रकल्प आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
रेल्वेच्या प्रश्नावर बोलताना, पुणे-नाशिक रेल्वे मार्ग संगमनेरमधूनच नेण्याच्या मागणीवर आपण ठाम असल्याचे सांगून, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जलसंपदा विभागाच्या माध्यमातून तालुका पाणीदार करण्याचा संकल्प सोडताना त्यांनी सांगितले की, निळवंडे धरणामुळे दुष्काळी गावांना मोठा दिलासा मिळाला असून, साकूर पठार भागातील सहा उपसा सिंचन योजनांच्या सर्वेक्षणाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. तसेच, भोजापूर चारीसाठी ४४ कोटींचा निधी मंजूर झाला असून भंडारदरा धरणाची पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी शासन स्तरावर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. असे मंत्री विखे पाटील यावेळी म्हणाले आहेत.
आमदार अमोल खताळ यांनी यावेळी “सामान्य कुटुंबातील तरुण आमदार झाल्याचे काही जणांना सहन होत नाहीये, म्हणूनच विकास कामात खोडा घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण, जनता महायुतीच्या पाठीशी खंबीर आहे," अशा शब्दांत विरोधकांवर निशाणा साधला. धनशक्तीचा वापर करून निवडणुका जिंकणाऱ्यांना आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत जनता पुन्हा धडा शिकवेल, असा विश्वासही आमदार खताळ यांनी व्यक्त केला.
दरम्यान याप्रसंगी बापूसाहेब देशमुख यांनी संगमनेर कारखान्याच्या उभारणीचा ऐतिहासिक प्रवास मांडला, तर शेतकरी नेते संतोष रोहोम यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील दूध अनुदानाची चौकशी करण्याची मागणी केली.
या कार्यक्रमासाठी माजी सभापती अंकुश कांगणे, भाजपचे गोकुळ दिघे, गुलाब भोसले, श्रीकांत गोमासे शिवसेनेचे रामभाऊ राहाणे, जोर्वेच्या सरपंच प्रीती दिघे, रहिमपूरच्या सरपंच सविता शिंदे, मालुंजेच्या सरपंच सुवर्णा घुगे, डिग्रसचे सरपंच अशोक खेमनर, बाळासाहेब शिंदे, काकासाहेब गायकवाड, राजेंद्र वर्पे, मंजाबापू साळवे, राहुल दिघे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान उत्कृष्ट नियोजन आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्तम राहींज, पिंपरणेचे सरपंच नारायण मरभळ, राजेंद्र देशमुख, स्वानंद चत्तर, संजय महाराज देशमुख, श्रीकांत बागुल, राहुल बागुल, शुभम देशमुख, संचित भारती, सुरेश गाडेकर, राजेंद्र काळे, गोरक्षनाथ कर्पे, सतीश रक्टे, प्रशांत राहींज, महेश खेमनर, निलेश चत्तर आदींनी विशेष परिश्रम घेतले.