सादतपूर शिवारात झालेल्या अपघातात एक ठार तर, दुसरा गंभीर जखमी

संगमनेर Live
0
सादतपूर शिवारात झालेल्या अपघातात एक ठार तर, दुसरा गंभीर जखमी

◻️ आश्‍वी पोलीस ठाण्यासमोर मयत कुटुंबातील नातेवाइकांचे ठिय्या आंदोलन


संगमनेर LIVE (आश्‍वी) | संगमनेर तालुक्यातील सादतपूत शिवारात रविवारी दुपारी झालेल्या अपघातात एक तरुण ठार झाला असून दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. यानंतर आक्रमक झालेल्या नातेवाईक यांनी लोणी - संगमनेर राज्य महामार्गावर काही काळ आणि आश्‍वी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. ३० तास उलटूनही अंत्यसंस्कार तसेच गुन्हा दाखल न झाल्याने परिसरात तणाव पुर्ण वातावरण आहे. 

याबाबत माहिती अशी की, सादतपूर शिवारात रविवारी (२८ डिसेंबर २०२५) दुपारी ३ वाजेच्या सुमारास एका जेसीबी ने धडक दिल्याने भिषण अपघात झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यानंतर जखमी तरुणाना लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, यामध्ये अमन शेख या तरुणांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. तर, दुसरा जखमी असलेला मुलगा कार्तिक मुळेकर यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. हे दोघेही चंद्रपूर (ता. राहाता) येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या अपघाताची माहिती मिळताच मयत आणि जखमी तरुणांच्या नातेवाईकांनी अपघातस्थळी धाव घेतली. यानंतर अपघातास कारणीभूत असलेल्या जेसीबी चालकाला तात्काळ अटक करावी आणि जो पर्यत अटक होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही व अंत्यसंस्कार करणार नसल्याची भुमीका नातेवाईकांनी घेतली. त्यानंतर त्यांनी लोणी - संगमनेर राज्य महामार्ग अडवून आंदोलन केले. यामुळे लोणी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन नातेवाईकांशी चर्चा केली. 

यानंतर मयत आणि जखमी तरुणांच्या नातेवाईकांनी आश्‍वी पोलीस ठाणे येथे येऊन त्या ठिकाणी तळ ठोकून आक्रमकपणे ठिय्या आंदोलन सुरू केले. यामुळे परीसरात तणाव निर्माण झाल्याने २० जणांचा समावेश असलेले दंगल नियंत्रण पथक पोलीस स्टेशनच्या आवारात दाखल झाले होते. रविवारी रात्री उशीरा व सोमवारी दुपारपर्यत नातेवाईक यांचे आंदोलन सुरुचं होते. 

दरम्यान आश्‍वी बुद्रुक बाजारतळावर पोलीस स्टेशन असल्याने सोमवारच्या आठवडे बाजारात ही तणाव दिसुन येत होता. सोमवारी दिवसभरात नातेवाईकांच्या संमती अभावी मयत तरुणाचे शवविच्छेदन झाले नसल्याचे समजते. त्यामुळे आज मंगळवारी (३० डिसेंबर) शवविच्छेदन झाल्यानंतरच अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे. तर, सोमवारी सायंकाळी उशीरापर्यत पोलीस ठाण्यात देखील याबाबत कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !