डॉ. विखे पाटील महाविद्यालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती उपक्रम
संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | डॉ. विठ्ठलराव विखे पाटील परिचर्या महाविद्यालयात जागतिक एड्स दिन (१ डिसेंबर) निमित्त विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. एड्सविषयी समाजातील पूर्वग्रह, कलंक आणि भेदभाव दूर करून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या दिनाचा मुख्य उद्देश असून एचआयव्ही विषाणूमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते व किरकोळ संसर्गही घातक ठरू शकतो, याबाबत विद्यार्थ्यांनी प्रभावी जनजागृती केली.
यावर्षीच्या गेल्या काळातील अडचणींवर मात करणे आणि एड्सविरोधातील प्रतिसादात बदल घडविणे या घोषवाक्यानुसार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने रॅलीचे आयोजन केले. विद्यार्थ्यांनी हातात होर्डिंग घेत घोषणाबाजी करून नागरिकांमध्ये एड्सविषयी जागरूकता निर्माण केली.
वांबोरी येथे विद्यार्थ्यांनी नाटिकेद्वारे एड्सचा प्रसार, लक्षणे, निदान पद्धती, उपचार व प्रतिबंधात्मक उपाय यावर प्रकाश टाकत प्रभावीपणे जनजागृती केली.
डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलच्या एआरटी सेंटरच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी रुग्ण व नातेवाईकांमध्ये माहितीपर संवाद साधत एड्सविषयी मार्गदर्शन केले. आठवडाभर रुग्णालय परिसरात एड्स प्रतिबंधक छायाचित्र प्रदर्शन, आरोग्यसेवा कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी अतिथी व्याख्यान, तसेच सुरक्षित रक्त संक्रमण पद्धतीवर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. न. ये. बी. च. विभागाच्या सहकार्याने नर्सिंग स्टाफसाठी कर्मचारी विकास कार्यक्रमाचाही समावेश होता.
या कार्यक्रमांचे आयोजन संस्थेचे संचालक डॉ. अभिजीत दिवटे, प्राध्यापक डॉ. रामचंद्र पडळकर व मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्राचार्या डॉ. प्रतिभा चांदेकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण एड्स जागृती सप्ताह राबवण्यात आला. उपप्राचार्य व विभाग प्रमुख डॉ. योगिता औताडे, तसेच विभाग प्रमुख अमोल टेमकर, अमित कडू, सौ. कविता भोकनल, सौ. सलोमी तेलधुणे आणि सहकारी राहुल कडू, अमोल अनाप, विशाल पुलाटे, प्रशांत अमरीत, सौ. संपदा म्हस्के, सौ. प्रीती कडू यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी केला.
दरम्यान एड्स जागृती सप्ताह विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा झाला असून विद्यार्थ्याच्या सहभागाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.