सावरगाव तळमध्ये माजी विद्यार्थ्यांचा 'महामेळावा'
◻️ शाळेच्या अमृत महोत्सवानिमित्त कर्तृत्ववान भूमीपुत्रांचा सन्मान!
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि प्रवरा माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थी लवकरचं भावनिक आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहेत. स्वामी विवेकानंद युवा जागृती प्रतिष्ठानच्या वतीने रविवार, दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी शाळेच्या प्रांगणात भव्य माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आणि भूमीपुत्र गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे कारण याच निमित्ताने जिल्हा परिषद शाळेच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत! शिक्षण क्षेत्रातील या ऐतिहासिक वाटचालीचा अमृत महोत्सव सोहळा देखील माजी विद्यार्थ्याच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
सावरगाव तळच्या जिल्हा परिषद आणि प्रवरा विद्यालयातून शिक्षण घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशात उच्च पदांवर आणि व्यवसायात स्थिरावलेल्या सर्व विद्यार्थ्याना एकत्र आणणे, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून शालेय जीवनातील जुन्या, सोनेरी आठवणींना उजाळा देणे आणि मित्र-मैत्रिणींसोबतच्या आपुलकीच्या नात्यांचे पुनरुज्जीवन करणे, हे प्रतिष्ठानचे ध्येय आहे.
या स्नेहमेळाव्याचे आणखी एक आकर्षण म्हणजे भूमीपुत्र गौरव समारंभ. शिक्षण आणि कर्तृत्वाच्या बळावर विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या आणि गावाचे नाव मोठे करणाऱ्या ‘माजी विद्यार्थ्याचा’ यावेळी विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
“सावरगाव तळ गावातून शिकून पुढे गेलेल्या सर्व विद्यार्थ्यानी या स्नेह मेळाव्यात उपस्थित राहून जुन्या मित्रांची भेट, शालेय आठवणी आणि गावाच्या अभिमानास्पद व्यक्तींचा गौरव अनुभवावा. हा कार्यक्रम गावाच्या एकात्मतेचा आणि आपुलकीचा प्रतीक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.”
दरम्यान या ऐतिहासिक क्षण आणि अमृत महोत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी गावातील सर्व माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि मान्यवरांनी मोठ्या संख्येने या स्नेह मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहान स्वामी विवेकानंद युवा जागृती प्रतिष्ठान, सावरगाव तळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.