साई संस्थानच्या सुरक्षा रक्षकाचा प्रामाणिकपणा; भक्ताचे ९ लाख केले परत

संगमनेर Live
0
सुरक्षा रक्षकाचा प्रामाणिकपणा; परदेशी साई भक्ताचे ९ लाख केले परत

◻️“कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकता आणि सेवा” शिर्डी संस्थानच्या सुरक्षा विभागाचा आदर्श

संगमनेर LIVE (​शिर्डी) | ​सुरक्षा कर्मचारी कृष्णा कुलकर्णी यांच्या उल्लेखनीय प्रामाणिकतेमुळे श्री साईबाबा संस्थानच्या विश्वसनीयतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. मंदिरात सापडलेली तब्बल १० हजार अमेरिकन डॉलर्स आणि पासपोर्ट असलेली बॅग त्यांनी त्वरित संबंधित अमेरिकेच्या भाविकाला परत केली. भारतीय मूल्यानुसार या रकमेची किंमत अंदाजे नऊ लाख रुपये इतकी आहे.

​गुरुवार, ११ डिसेंबर रोजी श्री साईबाबांची धूप आरती संपल्यानंतर मंदिराच्या पाठीमागील परिसरात सुरक्षा कर्मचारी कृष्णा कुलकर्णी यांना एक अनोळखी बॅग आढळून आली. ती बॅग कोणत्या भाविकाची आहे हे समजत नसल्यामुळे, कोणतीही दिरंगाई न करता त्यांनी ती बॅग संस्थानच्या संरक्षण कार्यालयात जमा केली.

​कार्यालयात बॅगेची पडताळणी करण्यात आली असता, त्यात १० हजार अमेरिकन डॉलर्स (अंदाजे ९ लाख रुपये) आणि मोहित धवन (USA) नावाचा पासपोर्ट आढळून आला. पासपोर्टवरील नावानुसार त्वरीत उद्घोषणा (अनाउन्समेंट) करण्यात आली. काही वेळातच, अमेरिकेचे साईभक्त मोहित धवन हे संरक्षण कार्यालयात आले आणि आवश्यक पडताळणीनंतर त्यांना त्यांची संपूर्ण रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षितपणे परत करण्यात आली.

​मोठी रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे त्वरित व सुरक्षितपणे परत मिळाल्यामुळे श्री साईभक्त मोहित धवन यांनी संस्थानच्या सुरक्षा व्यवस्थेचे आणि कर्मचारी कृष्णा कुलकर्णी यांच्या प्रामाणिक सेवाभावाचे मनःपूर्वक कौतुक केले. या घटनेमुळे शिर्डी संस्थानवरील त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

​श्री साईबाबा संस्थानची सुरक्षा व्यवस्था केवळ कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकतेवरच नव्हे, तर अत्याधुनिक सीसीटीव्ही (CCTV) विभागाच्या समन्वयावर आधारित आहे. संपूर्ण मंदिर आणि परिसरात २४×७ डिजिटल देखरेख, गर्दी नियंत्रण, हरवलेल्या वस्तूंबाबत जलद माहिती आणि संशयास्पद हालचालींवरील तात्काळ अलर्ट इत्यादी माध्यमातून सीसीटीव्ही विभाग सुरक्षा विभागाला अखंड मदत पुरवतो. हा समन्वय संस्थेच्या सुरक्षा प्रणालीचा मजबूत आधारस्तंभ ठरला आहे.

​या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना संरक्षण अधिकारी रोहिदास माळी म्हणाले, “आमचे प्राथमिक ध्येय भाविकांची संपूर्ण सुरक्षितता आहे. सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही विभागाचा समन्वय हा आमच्या प्रणालीचा मजबूत पाया आहे. आजच्या घटनेने आमच्या मूल्यांची पुन्हा एकदा उजळणी झाली आहे.”

मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना सांगितले, “सुरक्षा विभाग कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तत्परता व प्रामाणिकता ही श्री साईबाबांच्या सेवाभावाच्या शिकवणुकीशी पूर्णतः सुसंगत आहे. कृष्णा कुलकर्णी यांनी केलेले कार्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. अशा घटनांमुळे संस्थेवरील भाविकांचा विश्वास अधिकाधिक दृढ होतो.”

​त्‍यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, आणि सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी कृष्णा कुलकर्णी यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

दरम्यान यामुळे “सेवा, सुरक्षितता आणि प्रामाणिकता” या तीन स्तंभांवर श्री साईबाबा संस्थानची प्रतिष्ठा देश-विदेशातील भाविकांमध्ये अधिक दृढ होण्यास मोठी मदत होणार आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !