स्व. गोपीनाथ मुंडे यांना यशोधन कार्यालयात अभिवादन!
◻️ ‘आदर्श प्रशासक, लोकप्रतिनिधी आणि मैत्री जपणारा नेता', थोरात यांच्याकडून मुंडे यांच्या स्मृतींना उजाळा
संगमनेर LIVE | स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर बहुजनांच्या विकासासाठी लढा दिला. राज्यात उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री अशी विविध पदे भूषवताना त्यांनी सर्वाना सोबत घेऊन काम केले. पक्षविरहित मित्रत्वाचे नाते जपण्याचा त्यांचा स्वभाव होता. आदर्श प्रशासक, लोकप्रतिनिधी असलेले स्व. गोपीनाथ मुंडे हे कायम राजकारणापलीकडे जाऊन मैत्री जपणारे नेते होते, असे भावपूर्ण प्रतिपादन कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.
यशोधन जनसंपर्क कार्यालयात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे एक आदर्श लोकप्रतिनिधी, आदर्श प्रशासक आणि आदर्श मित्र होते. सर्वासाठी आयुष्यभर झटणारा नेता असा त्यांचा आवर्जून उल्लेख होतो. अनेक दिवस एकत्र काम करण्याची संधी आम्हाला मिळाली. आमचे पक्ष जरी वेगळे असले तरी पक्ष विरहित मैत्री त्यांनी कायम जपली.”
थोरात पुढे म्हणाले, “स्वर्गीय विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांची मैत्री ही महाराष्ट्रासाठी आनंदाचे पर्व होते. कोणताही भेदभाव न करता सर्वाना सोबत घेऊन जाणारे गोपीनाथ मुंडे यांनी उपमुख्यमंत्रिपद व केंद्रीय मंत्रिपद भूषवले. सर्व काळात शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी त्यांनी मोठी कामे केली. केंद्रीय मंत्री झाल्यानंतर खरे तर मोठे भविष्यकाळ त्यांना होता, मात्र त्यांच्या आपत्कालीन निधनाने महाराष्ट्रावर शोककळा पसरली. त्यांचे योगदान कायम महाराष्ट्रातील जनतेच्या स्मरणात राहील.”
राजकारण वेगळे, मैत्री वेगळी - डॉ. सुधीर तांबे
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनीही या मैत्रीच्या नात्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “राजकारणापलीकडे गोपीनाथराव मुंडे आणि लोकनेते बाळासाहेब थोरात यांची मैत्री होती. विलासराव देशमुख यांचे कायम बाळासाहेब थोरात यांच्यावर बंधुवत प्रेम राहिले. राजकारण वेगळे आणि मैत्री वेगळी ही महाराष्ट्राची संस्कृती राहिली.”
दरम्यान यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, युवक कॉग्रेस अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात, बी. आर. चकोर, राजेंद्र चकोर, सुभाष सांगळे, ज्ञानेश्वर नाईक, संतोष नागरे, ह.भ.प. नवनाथ महाराज आंधळे, भाऊसाहेब गीते, सोमनाथ गोडसे, रमेश सानप, दत्तू कोकणे, तात्याराम कुटे, भारत शेलकर, तुषार वनवे, नितीन सांगळे, श्रीकांत सांगळे, गोरख घुगे आदींसह तालुक्यातील कॉग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शरदचंद्र पवार यांचे थोरात यांच्याकडून अभिनंदन
या कार्यक्रमात देशाचे ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचेही अभिनंदन करण्यात आले. बाळासाहेब थोरात यांनी यावेळी बोलताना शरद पवार यांचा गौरव केला. “यशवंतराव चव्हाण यांचा वारसा जोपासणारे देशाचे ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. पुरोगामी विचार जपणारा लढवय्ये नेतृत्व म्हणजे शरद पवार साहेब! महाराष्ट्राच्या आणि देशाच्या उभारणीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्राला पवार साहेबांच्या मार्गदर्शनाची गरज असून, त्यांना उत्तम आरोग्य लाभो," अशी प्रार्थना थोरात यांनी केली.