पुणे - नाशिक सेमी - हायस्पीड रेल्वेवर तातडीने निर्णय घ्या!

संगमनेर Live
0
पुणे - नाशिक सेमी - हायस्पीड रेल्वेवर तातडीने निर्णय घ्या!

◻️ आमदार खताळ यांची विधानसभेत जीएमआरटी अडचणीवर कायमस्वरूपी तांत्रिक तोडगा काढण्याची मागणी.

​संगमनेर (नागपूर) | पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पुणे - नाशिक सेमी - हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला होत असलेल्या अवाजवी विलंबावर आमदार खताळ यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

​प्रकल्पाच्या मार्ग निश्चितीतील अनिश्चितता आणि जुन्नर तालुक्यातील खोडद येथील जीएमआरटी केंद्रामुळे निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींवर शासनाने तातडीने आणि स्पष्ट भूमिका मांडावी, अशी ठाम मागणी त्यांनी विधानसभेच्या पटलावर केली.

​प्रकल्प आणि संशोधन दोन्ही महत्त्वाचे!

​आमदार खताळ यांनी स्पष्ट केले की, जागतिक दर्जाच्या जीएमआरटीमुळे तांत्रिक बंधने असली तरी, प्रकल्प आणि वैज्ञानिक संशोधन - दोन्हींचे संरक्षण करणे शासनाच्या हातात आहे. “जीएमआरटीच्या सुरक्षेला कोणत्याही प्रकारची बाधा न आणता रेल्वेमार्गासाठी आवश्यक तांत्रिक पर्याय शोधणे शक्य आहे. त्यासाठी तत्काळ समन्वय साधून व्यवहार्य योजना निश्‍चित करावी. केवळ तांत्रिक अडचणीमुळे जिल्ह्यांचा विकास थांबवणे योग्य नाही,” असे त्यांनी सभागृहात जोर देऊन सांगितले.

​विलंब म्हणजे विकासाला अडथळा

​हा प्रकल्प अनेक वर्षापासून प्रलंबित असून, तिन्ही जिल्ह्यांच्या सर्वागीण प्रगतीसाठी तो अत्यावश्यक आहे. या पार्श्वभूमीवर मार्ग निश्चितीचा निर्णय विलंबात ठेवणे म्हणजे अप्रत्यक्षपणे विकासाला अडथळा निर्माण करण्यासारखे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

​आमदार खताळ यांनी पुन्हा एकदा संगमनेर मार्गाला आपले समर्थन दिले असून संगमनेर मार्ग हा लोकाभिलाषेचा असून, भौगोलिकदृष्ट्या देखील योग्य पर्याय असल्याचा पुनरुच्चार केला.

​अधिवेशनादरम्यान शासनाने प्रकल्पाच्या अंतिम मार्गाबाबत आणि जीएमआरटीशी संबंधित तांत्रिक समस्यांच्या निराकरणासंबंधी स्पष्ट व ठोस भूमिका व्यक्त करावी, अशी ठाम मागणी करून आमदार अमोल खताळ यांनी या महत्त्वाच्या प्रश्नाकडे विधानसभेचे लक्ष वेधले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !