‘संगमनेर गांजा तस्करी’चे प्रकरण हिवाळी अधिवेशनात गाजले
◻️ आमदार अमोल खताळ यांची दोषी सह ‘राजाश्रय' देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
संगमनेर LIVE | संगमनेर शहर आणि परिसरातील वाढत्या अमली पदार्थाच्या पुरवठ्याच्या आणि विक्रीच्या गंभीर समस्येवर संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवत, विधिमंडळाचे लक्ष वेधले. विशेषतः सुकेवाडी येथील ४५६ किलो गांजा तस्करीच्या सर्वात मोठ्या प्रकरणातील दोषींवर कठोरातील कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली. यावर राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.
४५६ किलो गांजा जप्त, मुख्य आरोपी अद्याप पसार
मागील आठवड्यात संगमनेर मतदारसंघातील सुकेवाडी येथे नाशिक विभागीय अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स आणि शहर पोलीस पथकाने संयुक्त छापा टाकून तब्बल ४५६ किलो गांजा जप्त करण्याची मोठी कारवाई केली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी तुषार उत्तम पडवळ अजूनही पसार असून, त्याच्या घराशेजारीच छोटा हत्ती टेम्पोमध्ये हा गांजा सापडला होता. या पार्श्वभूमीवर आमदार खताळ यांनी विधिमंडळात या प्रकरणावर आवाज उठवला.
राजाश्रय देणाऱ्यांचाही तपास करा!
आमदार अमोल खताळ यांनी विधिमंडळात मागणी केली की, संगमनेर शहर आणि ग्रामीण भागात अमली पदार्थाचा पुरवठा, तस्करी आणि विक्री करणाऱ्यांचा सखोल तपास करण्यासाठी स्थानिक पोलिसांची एक विशेष टीम नेमण्यात यावी.
या अवैध धंद्यांना 'राजाश्रय' (राजकीय पाठबळ) देणारे कोण आहेत, याचा देखील पोलिसांनी तपास करावा. या गुन्ह्यात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी आमदार खताळ यांनी केली.
गृहराज्यमंत्र्यांकडून कठोर कारवाईचे आश्वासन
आमदार खताळ यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हे गंभीर प्रकरण असून, त्याची सखोल चौकशी केली जाईल. तसेच, या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल, असे विधिमंडळात स्पष्ट केले.
‘आता कारवाया थांबणार नाहीत’
यानंतर बोलताना आमदार अमोल खताळ यांनी संगमनेरला अमली पदार्थ आणि ड्रग्जमुक्त करण्यासाठी तसेच तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी आपला सतत प्रयत्न सुरू राहील, असे सांगितले.
ते म्हणाले, “संगमनेरला अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांना राजाश्रय कोणाचा आहे, हे आता जनतेला समजू लागले आहे. आमच्या कार्यकाळात आता या अवैध धंद्यांवर कारवाया होत राहणार, त्यात कुठलीही तडजोड केली जाणार नाही. ड्रग्ज आणि गांजा तस्करी प्रकरणातील आरोपींचे फोटो आणि व्हिडिओमधून स्पष्ट दिसत आहेत की, ते कोणाचे कार्यकर्ते आहेत.” असा सवाल उपस्थित केला आहे.