शासकीय जागेत अतिक्रमण करून बेकायदेशीर भिंतीचे काम?

संगमनेर Live
0
शासकीय जागेत अतिक्रमण करून बेकायदेशीर भिंतीचे काम?

◻️ चंदनापुरी येथील भिंतीवरून वादाचे मोहोळ!

​संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांनी शासकीय नियम डावलून मनमानी कारभार केल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आल्यामुळे ऐकचं खळबळ उडाली आहे. तर, शासकीय चौकशी अहवालानंतर त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, चंदनापुरी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम करताना कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती. हे बांधकाम शासकीय जागेत अतिक्रमण करून करण्यात येत होते. या गंभीर प्रकाराबाबत ग्रामस्थ आकाश सोमनाथ राहाणे व अन्य शेतकरी, तसेच शाम विजय राहाणे यांनी जून २०२५ मध्ये वरिष्ठ कार्यालयांकडे लेखी तक्रारी दाखल केल्या होत्या.

​पंचायत समिती संगमनेर आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (अकोले) यांनी केलेल्या संयुक्त पाहणीत अत्यंत धक्कादायक बाबी समोर आल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या डिसेंबर २०२३ च्या अर्थसंकल्पात मंजूर असलेल्या चंदनापुरी ते सावरगाव तळ या महत्त्वाच्या रस्त्याच्या रुंदीकरण व डांबरीकरणाच्या कामात अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने या शाळेच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणतीही तांत्रिक मंजुरी किंवा पूर्वसूचना न घेता हे काम रेटले जात असल्याचे तपासात स्पष्ट झाल्याची माहिती असून या अनधिकृत बांधकामामुळे भविष्यात या मार्गावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होऊन अपघातांचा धोका वाढल्याचा इशारा अहवालात देण्यात आला आहे. 

विशेष म्हणजे, ज्या जागेवर हे बांधकाम सुरू होते, ती जागा सातबारा उताऱ्यानुसार स्मशानभूमीसाठी आरक्षित असल्याची देखील चर्चा आहे. ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगातून (२०२४-२५) सुमारे ५ लाख रुपयांच्या सार्वजनिक निधीचा विनियोग करताना कोणतेही अधिकृत रेखांकन, तांत्रिक प्रक्रिया किंवा संबंधित विभागांची परवानगी न घेता हा 'पांढरा हत्ती' उभा करण्याचा प्रयत्न झाल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे.

​या संपूर्ण प्रकरणात पंचायत समितीने ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवला होता. मात्र, अद्याप कोणताही लेखी खुलासा सादर न केल्याने प्रशासकीय वर्तुळात संशय बळावला आहे. त्यामुळे कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली असून शासकीय नियमांचे उल्लंघन करून जनतेच्या पैशाचा गैरवापर करणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई व्हावी आणि चंदनापुरी ग्रामपंचायतीच्या संपूर्ण कारभाराची सखोल चौकशी व्हावी," अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !