पालकमंत्री विखे आणि आमदार खताळ यांच्या हस्ते आज विविध विकास कामांचा शंखनाद
◻️ ५१ कोटींचा निधी, १० गावे अन् पिंपरणे येथे भव्य जाहीर सभा
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा नियोजन आणि आमदार निधीतून मंजूर झालेल्या सुमारे ५१ कोटी ३९ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा आज शनिवार दि. २७ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.
राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा विकासोत्सवाचा सोहळा पार पडणार आहे.
शनिवारी सकाळी १० वाजेपासून विविध गावांमध्ये विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यास सुरुवात होईल. या झंझावाती दौऱ्याची सांगता संध्याकाळी पिंपरणे येथे एका भव्य जाहीर सभेने होणार आहे.
या विकास दौऱ्यात तालुक्याच्या विविध भागांतील महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन होणार आहे. यामध्ये मालदाड येथील १७ कोटी २९ लाख रुपयांच्या विकासकामांसह मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्यांचा समावेश आहे. पिंपळनेर ते कोळवाडी रस्त्यासाठी १० कोटी ६४ लाख रुपये, तर मिर्झापूर ते धांदरफळ खुर्द या रस्त्यासाठी ६ कोटी ५९ लाख रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. वडगाव लांडगा येथे ५ कोटी २१ लाख रुपयांच्या कामांसह निळवंडे कालवा एस्केपचे भूमिपूजन होईल.
यासोबतच हिवरगाव पावसा येथे ५ कोटी ८ लाख आणि निळवंडे डाव्या कालव्यावरील विविध गावांमधील १० लोखंडी पुलांसाठी ४ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. चंदनापुरी (३ कोटी ८१ लाख), गुंजाळवाडी (१ कोटी ९० लाख), तळेगाव (१ कोटी ६० लाख) आणि धांदरफळ खुर्द (१ कोटी ३८ लाख) या गावांमध्येही विविध विकासकामांचा शुभारंभ होऊन ग्रामीण भागाचे जाळे अधिक सक्षम होणार आहे.
विकासकामांच्या सोहळ्यासोबतच बळीराजाला बळ देण्यासाठी धांदरफळ येथील कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर शासनाच्या अनुदानाचे आणि मदतीचे वाटप केले जाणार आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ३३ लाभार्थ्याना ट्रॅक्टर, विविध अवजारे आणि स्प्रेयरसाठी ३५ लाख २५ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात येणार आहे.
तसेच, दुर्दैवी घटनेत नुकसान झालेल्या शेतकरी कुटुंबांना आधार देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेतून ८ लाभार्थ्यांना प्रत्येकी २ लाख रुपये याप्रमाणे १६ लाख रुपयांची मदत दिली जाईल. आधुनिक शेतीला चालना देण्यासाठी एमआयडीएच अंतर्गत हरितगृह आणि शेडनेट उभारणाऱ्या १४ लाभार्थ्यांना १ कोटी ५३ लाख रुपयांचे अनुदान मान्यवर नेत्यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहे.
दरम्यान “हा सोहळा संगमनेरच्या विकासाची नवी दिशा ठरणार आहे. तरी निळवंडे, तळेगाव, मालदाड, गुंजाळवाडी, वडगाव लांडगा, धांदरफळ, चंदनापुरी, हिवरगाव पावसा आणि पिंपरणे या परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,” असे आवाहन संगमनेर तालुका महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.