बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचे संगमनेरात तीव्र पडसाद!
◻️ महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून बांगलादेशी ध्वजाचे दहन
संगमनेर LIVE | बांगलादेशामध्ये अल्पसंख्याक हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. एका ३० वर्षीय हिंदू तरुणाची निर्घृण हत्या करून त्याचा मृतदेह झाडाला टांगून ठेवल्याच्या अमानवी घटनेचे पडसाद आज संगमनेर शहरात उमटले.
यावेळी या क्रूर घटनेचा निषेध करण्यासाठी ‘महायुती'च्या वतीने संगमनेर बसस्थानक परिसरात गुरुवारी (दि. २५) जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी बांगलादेशी ध्वजाची होळी करत आपला संताप व्यक्त केला.
आंदोलनादरम्यान महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी बांगलादेशी रोहिंग्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “एका निष्पाप हिंदू तरुणाची अशा प्रकारे हत्या करणे ही मानवतेला काळीमा फासणारी घटना असून, संपूर्ण जगात या निषेधार्ह कृत्याबद्दल चीड व्यक्त होत आहे," अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
केवळ निषेधच नव्हे, तर महायुतीने स्थानिक प्रशासनालाही निर्वाणीचा इशारा दिला आहे. संगमनेर शहर आणि परिसरात अनेक बांगलादेशी रोहिंगे बेकायदेशीरपणे घुसलेले असून त्यांनी बोगस कागदपत्रांद्वारे मतदार म्हणून नोंदणी केल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला.
“पोलिसांनी तातडीने शोध घेऊन या घुसखोरांची हकालपट्टी करावी, अन्यथा महायुती आपल्या 'स्टाईल'ने आंदोलन करून त्यांना हुसकावून लावेल,” असा इशारा महायुतीच्या नेत्यांनी दिला.
दरम्यान यावेळी दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी, रमेश काळे, सौरभ देशमुख, रोहित चौधरी, गुलाब भोसले, श्रीकांत गोमासे, कैलास कासार, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, सपना जाधव, संगीता पुंड, पूनम अनाप, दिपाली वाव्हळ, भारत गवळी, अभिजीत पुंड, प्रवीण कर्पे, राहुल भोईर, शशांक नामन, अक्षय थोरात, रोहिदास खताळ, रोहिदास साबळे, केशव जाधव, सीताराम पानसरे, लाला दायमा, अक्षय वर्पे, प्रवीण दिड्डी, श्याम नाईकवाडी, सागर भोईर, बंटी मंडलिक, राहुल जाधव, अजित जाधव, समीर ओझा, श्याम कोळपकर, अंबादास अनमल आदींसह महायुतीमधील सर्वच घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.