ग्रामीण समृद्धीचा ‘संगमनेर सहकार पॅटर्न’ देशाला दिशादर्शक
◻️ केंद्रीय अतिरिक्त सचिव पंकज कुमार बंसल यांचे गौरवोद्गार
◻️ शिस्त, पारदर्शकता अन् आधुनिकता: संगमनेरच्या सहकार चळवळीचा दिल्लीत डंका!
संगमनेर LIVE | “महाराष्ट्रामध्ये सहकारी चळवळीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. अनेक ठिकाणी सहकार अडचणीत असताना संगमनेरच्या सहकार चळवळीने शिस्त, पारदर्शकता आणि आधुनिकतेचा वापर करून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. संगमनेरचा हा ‘सहकार पॅटर्न’ संपूर्ण देशासाठी दिशादर्शक आहे,” असे प्रतिपादन भारत सरकारच्या सहकार विभागाचे केंद्रीय अतिरिक्त सचिव पंकज कुमार बंसल (IAS) यांनी केले.
बंसल आणि त्यांच्या पत्नी जी. ललिता (IAS, कर्नाटक) यांनी नुकतीच संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याला सदिच्छा भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.
या विशेष भेटीदरम्यान बंसल दाम्पत्याने कारखान्याच्या विविध विभागांना भेट देऊन कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये कारखान्याची अद्ययावत प्रशासकीय इमारत, को-जनरेशन प्रकल्प, इथेनॉल प्रकल्प आणि ‘राजहंस’ प्रकल्पांचा समावेश होता.
अनेक ठिकाणी सहकारी संस्था व्यवस्थापनाअभावी अडचणीत येत असताना, संगमनेरने मात्र शिस्त आणि पारदर्शकतेची कास धरत एक आदर्श वस्तुपाठ समोर ठेवल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषतः कारखान्याने स्वीकारलेली नवी तंत्रज्ञान प्रणाली आणि ५५०० मे. टनाचा नवीन प्रकल्प हा आधुनिकतेचा उत्तम आविष्कार असून तो कौतुकास्पद असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
पंकज कुमार बंसल पुढे म्हणाले की, “ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली येथील सर्व सहकारी संस्था अत्यंत आदर्शवत काम करत आहेत. कारखान्याची नवीन प्रशासकीय इमारत ही देशातील सुसज्ज अशी एकमेव वास्तू ठरेल.” यावेळी त्यांनी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या स्मृतींना अभिवादन करत कृतज्ञता व्यक्त केली.
कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडुरंग घुले यांनी मान्यवरांचे स्वागत केले. ते म्हणाले की, “आमच्याकडे केवळ व्यवसाय म्हणून नव्हे, तर सर्वसामान्यांच्या समृद्धीसाठी काम केले जाते. पुढील ५० वर्षाचे नियोजन करून आम्ही ३० मेगावॅट वीज निर्मितीचा प्रकल्प आणि ५५०० मे. टनाचा विस्तार केला आहे.” असे सांगितले.
दरम्यान या प्रसंगी गिरीराज अग्निहोत्री,संजय गोंदे, जगन्नाथ घुगरकर, संपतराव गोडगे, रामनाथ कुटे, योगेश भालेराव, दिलिप नागरे, मदन आंबरे, गुलाबराव देशमुख, अरुण वाकचौरे, सौ. सुंदराबाई दूबे, रावसाहेब दुबे, किरण कानवडे, कृष्णा दिघे, अशोक मुटकुळे यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.