मतदारांप्रती कृतज्ञता’ व्यक्त करण्यासाठी महायुतीने केला आभार दौरा
◻️ संगमनेरच्या विकासाचा ध्यास आम्ही सोडणार नाही - आमदार अमोल खताळ
संगमनेर LIVE | संगमनेर नगरपरिषद निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नसले, तरी महायुतीवर विश्वास ठेवून मतदान करणाऱ्या मतदारांचे आभार मानण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी पुढाकार घेतला. ‘पराभवाने खचून न जाता, मतदारांनी दिलेल्या प्रेमाचा स्वीकार करणे’ या भावनेतून शहरात भव्य पायी आभार फेरी काढण्यात आली.
आमदार अमोल खताळ यांनी महायुतीचे उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यासह प्रभाग क्रमांक १२, १३ व १४ मधील मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या. स्वातंत्र्य चौकातून या दौऱ्याला उत्साहात सुरुवात झाली. यामध्ये अशोक चौक, चावडी मेन रोड, कुंभार गल्ली, बाजारपेठ, लालबहादूर शास्त्री चौक, जेधे कॉलनी, चव्हाणपूरा, रंगार गल्ली, चंद्रशेखर चौक, नेहरू चौक, घास बाजार, उपासनी गल्ली, राम मंदिर, साईनगर, घोडेकर मळा, पंपिंग स्टेशन, साईबाबा मंदिर, लाल तारा हाऊसिंग सोसायटी, माळीवाडा या भागातून दौऱ्या दरम्यान आमदार अमोल खताळ यांनी मतदारांशी संवाद साधला आणि पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी बोलताना आमदार खताळ म्हणाले की, “निवडणुकीत जय-पराजय होतच असतात, परंतु महायुतीवर विश्वास ठेवून मतदान करणाऱ्या प्रत्येक मतदाराचे आभार मानणे हे आमचे कर्तव्य आहे. भविष्यातही शहराच्या विकासासाठी आणि जनहिताच्या कामांसाठी आम्ही अधिक जोमाने कटिबद्ध राहू.” असे म्हटले आहे.
दरम्यान या आभार दौऱ्यात महायुतीचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये प्रामुख्याने दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी, पायल ताजणे, पुनम दायमा, उमेश ढोले, सागर भोईर, साक्षी सूर्यवंशी, प्रवीण कर्पे, नीता मोहरीकर यांचा समावेश होता.