​“एकमेकांचे सण साजरे केल्याने आनंदाचा गुणाकार होतो” - बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
​“एकमेकांचे सण साजरे केल्याने आनंदाचा गुणाकार होतो” - बाळासाहेब थोरात

◻️ ​लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत ‘सुदर्शन’ आणि ‘प्रभा’ निवासस्थानी ‘येशू गीतांचा जागर’

◻️ मानवता हाच जगातील श्रेष्ठ धर्म; येशू ख्रिस्ताचा शांतीचा संदेश अंगीकारा'


​संगमनेर LIVE | “मानवता हा जगातील सर्वात मोठा धर्म आहे. प्रार्थना ही प्रत्येकाला ईश्वराच्या समीप घेऊन जाते. आजच्या काळात सुख, समाधान आणि शांतीसाठी सर्वानी एकत्र प्रेमाने राहणे आवश्यक असून, नाताळ हा सण याच बंधुभावाचा संदेश देतो,” असे प्रतिपादन कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.

​नाताळ व नवीन वर्षाच्या निमित्ताने संगमनेर येथे आयोजित 'गाणी येशू जन्माची' या कार्यक्रमानंतर शुभेच्छा देताना ते बोलत होते.

राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारांचा दाखला देत, प्रार्थना माणसाला आध्यात्मिक शक्ती देते, असे थोरात यांनी नमूद केले. दया, क्षमा आणि शांती या त्रिसूत्रीचा वापर करून शत्रूलाही प्रेमाने जिंकण्याचे सामर्थ्य येशू ख्रिस्तांनी दिले आहे. संगमनेर तालुक्यातील ख्रिश्चन बांधव ज्या उत्साहाने हा सण साजरा करतात, तो सामाजिक एकोपा कौतुकास्पद असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

डॉ. सुधीर तांबे यांनीही आपले विचार मांडले. ते म्हणाले, “नम्रता हे यशाचे सर्वात मोठे साधन आहे. आजच्या अशांत वातावरणात प्रेमाचा संदेशच जगाला तारू शकतो.”

​या कार्यक्रमाला सौ. दुर्गाताई तांबे यांची विशेष उपस्थिती होती, त्यांनी स्वतः येशू गीतांच्या गायनात सहभाग नोंदवून उपस्थितांचा उत्साह वाढवला.

​दरम्यान याप्रसंगी रेव्ह. सतीश मिरजकर, सह्याद्री संस्थेचे सहसचिव प्रा. बाबा खरात, सत्यानंद कसाब, स्वप्निल कसाब, प्रवीण रोहम, राजेंद्र सांगळे, बाळासाहेब घोडके, हन्ना जाधव, विलास जाधव, विजय खंडीझोड, भाऊसाहेब नेटके, प्रा. गणेश गुंजाळ, प्रा. संजय जगताप, नितीन आल्हाट आदी मान्यवर व ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​'येशू गीतांचा जागर' ठरला आकर्षणाचे केंद्र

​प्रा. बाबा खरात यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब थोरात यांच्या 'सुदर्शन' आणि डॉ. तांबे यांच्या 'प्रभा' निवासस्थानी येशू गीतांचा विशेष कार्यक्रम पार पडला. मानवतेच्या उद्धाराची आणि येशू जन्माची भक्तिगीते गायली गेल्याने संपूर्ण परिसर मंगलमय झाला होता.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !