बिबट्याविरुद्ध ‘विशेष मिशन’ राबवण्यासाठी डॉ. जयश्री थोरात यांची वनमंत्र्यांशी चर्चा
◻️ ‘प्रकाश योजना’ आणि ‘विशेष टास्क फोर्स’ नेमण्याची आग्रही मागणी; वनमंत्र्यांचे तातडीने कारवाईचे आदेश
◻️ बिबट्यांच्या हल्ल्यांविरोधात डॉ. जयश्री थोरात मैदानात
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांच्या हल्ल्यांनी थैमान घातले असून, यामध्ये निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत तालुका युवक कॉग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची मुंबई येथील मंत्रालयात भेट घेतली. ग्रामीण भागात 'प्रकाश योजना' राबवण्यासह नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याची आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.
डॉ. जयश्री थोरात यांनी वनमंत्र्याशी चर्चा करताना संगमनेर तालुक्यातील बिबट्याच्या दहशतीचा प्रश्न आक्रमकपणे मांडला. त्यांनी मागणी केली की, ग्रामीण भागातील रस्त्यांवर आणि शेती परिसरात तातडीने पुरेशी प्रकाश व्यवस्था कार्यान्वित करून ‘प्रकाश योजना’ राबवावी. तसेच बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने विशेष ‘टास्क फोर्स’ स्थापन करून ठोस कृती आराखडा तयार करावा. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना किंवा मृत व्यक्तींच्या वारसांना शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत कोणत्याही तांत्रिक अडचणीविना त्वरित मिळावी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांशी सातत्याने संवाद साधून त्यांच्या मनात सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करावा, अशा महत्त्वपूर्ण मागण्यांवर डॉ. थोरात यांनी या चर्चेत जोर दिला.
यावेळी बोलताना डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, “संगमनेर हा दुग्ध व्यवसायात अग्रेसर असलेला तालुका आहे. चारा कापणीसाठी महिला आणि शेतकऱ्यांचा शेतात रात्रंदिवस वावर असतो. मात्र, बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे सध्या ग्रामीण भागात दहशतीचे वातावरण आहे. गेल्या आठवड्यात अल्पवयीन सिद्धेश सुरज कडलग याचा झालेला मृत्यू अत्यंत क्लेशदायक आहे. ही जीवितहानी थांबवण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.”
डॉ. थोरात यांच्या मागण्यांची दखल घेत वनमंत्री गणेश नाईक यांनी तत्काळ वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून सूचना दिल्या. “मानवी जीवनाचे संरक्षण ही आमची प्राथमिकता आहे,” असे सांगत त्यांनी डॉ. थोरात यांनी सुचवलेल्या उपाययोजनांवर तात्काळ नियोजन करण्याचे आदेश दिले.
तसेच, या घटनेबाबत लोकनेते बाळासाहेब थोरात यांनीही सातत्याने पाठपुरावा केल्याचे नाईक यांनी नमूद केले. सिद्धेश कडलगच्या घटनेनंतर बाळासाहेब थोरात यांनी तातडीने संपर्क साधला होता, त्यावरून वन विभागाला आधीच सतर्क केले असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान या भेटीदरम्यान केवळ बिबट्याचा प्रश्नच नव्हे, तर पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था यावरही डॉ. जयश्री थोरात यांनी सविस्तर चर्चा केली. या बैठकीला मंत्रालयातील वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.