भूतकाळ हा भविष्याचा मार्गदर्शक; २०२६ हे वर्ष संकल्पपूर्तीचे ठरो!
◻️ ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे आणि डॉ. जयश्री थोरात यांच्याकडून जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा
संगमनेर LIVE | “भूतकाळ हा भविष्यकाळाचा मार्गदर्शक असून प्रत्येक नवीन दिवस आणि नवीन वर्ष नवी आशा, नवी ऊर्जा घेऊन येतो. त्याप्रमाणे २०२६ हे नवीन वर्ष प्रत्येकासाठी आरोग्यदायी, आनंदाचे आणि सुख-समृद्धीचे ठरावे,” अशा शब्दांत कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, “भूतकाळ हा प्रत्येकाचा मार्गदर्शक असून त्यावरच भविष्याची वाटचाल ठरलेली असते. नवीन वर्षामध्ये प्रत्येकाला उत्तम आरोग्याबरोबरच दर्जेदार जीवनमान मिळावे, यासाठी आपण सर्वानी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. मागील वर्षात अनेक चांगल्या-वाईट घडामोडी घडल्या आहेत, मात्र त्यातील वाईट गोष्टींची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने गांभीर्याने घ्यायला हवी. आपले गाव, शहर, तालुका, राज्य आणि पर्यायाने देश अधिक प्रगत घडवण्यासाठी प्रत्येकाने या निमित्ताने एक सकारात्मक संकल्प करावा.”
ते पुढे म्हणाले की, “सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत, संविधानाचा सन्मान आणि लोकशाहीचा विचार जपून आपण सर्वानी राष्ट्रहितासाठी समर्पित व्हावे. मानवता हाच सर्वात मोठा धर्म असून, संत व थोर समाजसुधारकांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे ही आपली जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.
२०२६ हे वर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो आणि युवकांनी विज्ञाननिष्ठ विचार अंगीकारून निरोगी समाज निर्मितीसाठी व सर्वागीण विकासासाठी योगदान द्यावे,” अशा शुभेच्छा माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिल्या.
महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जपत प्रगतीचे आवाहन करताना आमदार सत्यजीत तांबे म्हणाले की, “प्रत्येकाने आपल्या जीवनातील उद्दिष्टे आणि यश संपादन करण्यासाठी पूर्ण कार्यक्षमतेने योगदान देणे आवश्यक आहे. नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करत असतानाच नवनिर्मितीवर भर देणे ही काळाची गरज आहे. २०२६ या नवीन वर्षात प्रत्येकाला उत्तम आरोग्य आणि मानसिक समाधान लाभावे. आपल्यातील सकारात्मक कामातूनच समाजाच्या आणि प्रत्येकाच्या जीवनात खऱ्या अर्थाने आनंदाची निर्मिती होऊ शकते, त्यामुळे नवनवीन संधींचा शोध घेत प्रगतीपथावर राहण्यासाठी सर्वानी प्रयत्नशील राहावे," अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या.
धावपळीच्या जीवनात आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करताना डॉ. जयश्रीताई थोरात यांनी युवकांना संदेश दिला की, “आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाचे स्वतःच्या आरोग्याकडे नकळत दुर्लक्ष होत असते. मात्र, येणाऱ्या नवीन वर्षामध्ये प्रत्येकाला आनंदी जीवनासाठी आरोग्य आणि समृद्धी लाभावी, हीच मुख्य अपेक्षा आहे. लोकशाहीचा प्रगल्भ विचार मनात ठेवून युवकांच्या हातून विधायक आणि रचनात्मक कार्य उभे राहावे.” त्यांनी सर्वाना “स्वस्थ रहा, मस्त रहा, जबरदस्त रहा” असा आरोग्यदायी आणि ऊर्जावान मंत्र देत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.