ग्रामीण शिक्षणाला ‘हायटेक’ आणि ‘संस्कारक्षम’ टच देणारे नवं नेतृत्व - डॉ. सुष्मिता विखे पाटील
◻️ संस्कार, तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासाचा ध्यास असलेल्या ‘माईताई’ना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी ग्रामीण महाराष्ट्रात सहकार आणि शिक्षणाची जी मुहूर्तमेढ रोवली, तो वटवृक्ष आज बहरला आहे. या वारशाची पताका समर्थपणे खांद्यावर घेऊन, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेला आधुनिकतेची जोड देण्याचे महत्त्वपूर्ण काम संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) डॉ. सुष्मिता विखे पाटील करत आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांच्या दूरदृष्टीतून आकारास आलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा हा लहानसा आढावा.
जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, प्रवरेचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील आणि युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील आणि प्रवरा परिवारातील ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुष्मिताताईनी संस्थेमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत.
स्पर्धा परीक्षा आणि शैक्षणिक गुणवत्ता
ग्रामीण भागातील विद्यार्थी केवळ हुशार असून चालणार नाही, तर तो आजच्या युगात स्पर्धेत टिकला पाहिजे, या उदात्त हेतूने डॉ. सुष्मिताताईनी शैक्षणिक गुणवत्तेवर विशेष भर दिला आहे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेशासाठी ग्रामीण विद्यार्थ्याना शहराकडे धाव घ्यावी लागू नये, यासाठी संस्थेच्या माध्यमातूनच 'नीट' (NEET), 'जेईई' (JEE) आणि 'सीईटी' (CET) यांसारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करून घेतली जात असून, त्यासाठी सुसज्ज अभ्यासिका आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांची उपलब्धता करून दिली आहे.
स्पर्धा परीक्षांचे महत्त्व ओळखून ‘चाणक्य कौशल्य व स्पर्धा परीक्षा केंद्रा’च्या माध्यमातून एमपीएससी, यूपीएससी तसेच पोलीस आणि सैन्य भरतीचे प्रशिक्षण दिले जात आहे. एवढेच नव्हे तर, विद्यार्थ्याचा पाया शालेय जीवनापासूनच पक्का असावा, या दूरदृष्टीतून इयत्ता ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यासाठी १ जानेवारी २०२६ पासून ‘प्रवरा फाउंडेशन अकॅडमी’ सुरू करण्यात येत आहे, ज्यामुळे विद्यार्थ्याच्या गुणवत्तेला आणि करिअरला योग्य दिशा मिळणार आहे.
कृषी आणि उद्योग: ‘नोकरी मागणारे नाही, देणारे व्हा’
पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्याना व्यावहारिक आणि व्यावसायिक ज्ञान मिळावे, यासाठी सुष्मिताताई नेहमीच आग्रही असतात. शेतकऱ्यांच्या मुलांना केवळ पारंपारिक शेतीपुरते मर्यादित न ठेवता, त्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, कमी जागेत जास्त उत्पादन घेण्याच्या पद्धती आणि शेतमालाचे मार्केटिंग याचे धडे महाविद्यालयाच्या माध्यमातून दिले जात आहेत. विद्यार्थ्याच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी ‘प्रवरा बिल्डिंग’ आणि ‘प्रवरा बिझनेस एक्स्पो’ यांसारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले आहे.
या माध्यमातून विद्यार्थ्यानी तब्बल दोन कोटींची उलाढाल करत रोजगार निर्मितीच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकले आहे. तसेच, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यामध्ये उद्योजकता रुजावी यासाठी ‘प्रिझम स्टार्ट-अप’ला चालना देण्यात आली असून, इस्रोशी संलग्न संशोधन कार्यातही त्यांनी पुढाकार घेतला आहे. प्रवरेचा विद्यार्थी हा केवळ नोकरी मागणारा नव्हे, तर नोकरी देणारा उद्योजक बनावा, हेच यामागील प्रमुख उद्दिष्ट आहे.
संस्कृती संवर्धन आणि सामाजिक भान
प्रवरेचा विद्यार्थी हा केवळ स्पर्धात्मक युगात धावणारा नसावा, तर तो आपल्या मुळांशी जोडलेला आणि भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगणारा असावा, असा डॉ. सुष्मिताताईचा आग्रह असतो. ‘सहकारातून समृद्धीकडे’ या संकल्पनेतून त्यांनी राबवलेला ‘प्रवरा सांस्कृतिक गणेश उत्सव’ हा उपक्रम परिसर आणि विद्यार्थ्यासाठी मैलाचा दगड ठरला आहे. लाठी-काठी, झांज आणि ढोल-ताशांच्या गजरात त्यांनी ‘डीजे मुक्त गणेश उत्सवा’चा एक नवा पायंडा पाडला, ज्यामध्ये सुमारे ५००० विद्यार्थ्याच्या शिस्तबद्ध पथकांनी विश्वविक्रमी मिरवणूक सादर केली.
यासोबतच, आषाढी वारीमध्ये ३० हजार विद्यार्थ्याचा सहभाग नोंदवून त्यांनी नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने समाजातील ‘नवदुर्गा’ असणाऱ्या कर्तृत्ववान महिलांची ओळख विद्यार्थ्यांना करून देणे असो, वा वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून देशाची विविधता मांडणे असो, या प्रत्येक कृतीतून त्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान आणि संस्कारांची रुजवणूक करत आहेत.
आरोग्य आणि क्रीडा
विद्यार्थ्याच्या सर्वागीण विकासासाठी केवळ बुद्धीच नव्हे, तर शरीरही सुदृढ असणे आवश्यक आहे, हे ओळखून डॉ. सुष्मिताताईनी आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रेरणेतून त्यांनी नोव्हेंबर महिन्यात ‘सेंट्रलाईज्ड किचन’ची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. या माध्यमातून संस्थेच्या विविध वसतिगृहांमधील सुमारे साडेसहा हजार मुला-मुलींना एकाच ठिकाणाहून दर्जेदार आणि सात्विक जेवण पुरवले जाते.
खेळाच्या मैदानातही प्रवरेचा झेंडा उंचवावा, यासाठी त्यांनी ‘प्रवरा स्पोर्ट्स अकॅडमी’ची स्थापना केली आहे. या अकॅडमीच्या माध्यमातून खेळाडूंना शास्त्रोक्त प्रशिक्षण आणि अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिल्याने, आज अनेक विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर आपल्या कौशल्याची चुणूक दाखवत आहेत. सुदृढ शरीर आणि निकोप मन यांतूनच भविष्यातील सक्षम नागरिक घडतील, हा त्यांचा ठाम विश्वास या उपक्रमांतून दिसून येतो.
‘‘माईताई’ एक आश्वासक नेतृत्व
प्रवरा परिवारात प्रेमाने ‘माईताई’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. सुष्मिता विखे पाटील या प्रसिद्धीच्या झोतात न राहता, निष्ठेने काम करण्यावर भर देतात. आपल्या उच्चशिक्षित आणि संशोधक वृत्तीचा उपयोग त्यांनी ग्रामीण विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी केला आहे. सोशल मीडियाचा वापर समाजकार्यासाठी कसा करावा, याचे भानही त्यांनी विद्यार्थ्याना दिले आहे.
संस्थेच्या वाटचालीत सक्रिय सहभाग नोंदवत, भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी सज्ज असलेल्या आणि महिला नेतृत्वाचा आदर्श ठरलेल्या डॉ. सुष्मिता तथा ‘माईताई’ यांना १ जानेवारी २०२६ रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
लेखन आणि शब्दांकन :- यमन पुलाटे, लोणी
9623629767