सरकारने तातडीने युरियाचा पुरवठा करावा - बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
सरकारने तातडीने युरियाचा पुरवठा करावा - बाळासाहेब थोरात

◻️ राज्यासह संगमनेर तालुक्यात युरियाचा प्रचंड तुटवडा
 

​संगमनेर LIVE | यावर्षी सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात मोठ्या उत्साहाने पिकांची लागवड केली आहे. मात्र, पिके ऐन जोमात असतानाच राज्यात युरिया खताचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शासनाने या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने सर्व शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

​शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, “संगमनेर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यात गहू, हरभरा, मका आणि कांदा या पिकांची विक्रमी लागवड झाली आहे. पिकांच्या वाढीसाठी युरिया अत्यंत आवश्यक असताना नेमकी याच काळात टंचाई निर्माण होणे दुर्दैवी आहे. ही टंचाई नैसर्गिक आहे की काही व्यापाऱ्यांकडून ती ‘कृत्रिम’ पद्धतीने निर्माण केली जात आहे, याची सरकारने सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.”

​बाळासाहेब थोरात यांनी सरकारला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देताना सांगितले की, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि तो सातत्याने अस्मानी-सुलतानी संकटांचा सामना करत असतो. अशा कठीण प्रसंगी सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे अपेक्षित आहे. “कॉग्रेस आघाडी सरकारने नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. आताच्या सरकारनेही केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा,” असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

​शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडताना बाळासाहेब थोरात यांनी शासनाकडे महत्त्वाच्या मागण्यांचा आग्रह धरला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, रब्बी हंगामातील पिके वाचवण्यासाठी कृषी विभागाने तातडीने हालचाली करून संगमनेर तालुक्यासह राज्यभर युरियाचा पुरेसा बफर स्टॉक उपलब्ध करून दिला पाहिजे. तसेच, निवडणुकीच्या प्रचारात महायुती सरकारने दिलेले सरसकट कर्जमाफीचे आश्वासन पाळावे आणि राज्यातील प्रत्येक गरजू शेतकऱ्याचा सातबारा कोरा करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

याव्यतिरिक्त, गेल्या काळात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांची भरपाई अद्याप प्रलंबित असून, ही मदत विनाविलंब शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, जेणेकरून संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा उभारी घेऊ शकेल.

​सध्या रब्बी हंगाम निर्णायक टप्प्यावर आहे. युरिया मिळत नसल्याने पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. खत केंद्रांवर खतासाठी रांगा लागत असून, शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी आक्रमक पवित्रा घेत शासनाने ही मागणी गांभीर्याने न घेतल्यास शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा इशाराही दिला आहे.

​“शेतकरी अडचणीत असताना सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये. रब्बी पिके वाचवण्यासाठी युरियाचा पुरवठा हा तातडीचा प्रश्न असून तो प्राधान्याने सोडवला जावा.” अशी आग्रही मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !