आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून एकाच वर्षात ८४९ कोटींचा विकासनिधी!

संगमनेर Live
0
आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून एकाच वर्षात ८४९ कोटींचा विकासनिधी!

◻️ ग्रामीण रस्त्यांपासून, आरोग्य, सिंचन, उद्योग आणि एमआयडीसीपर्यत विकासकांना गती

​संगमनेर LIVE | ​संगमनेर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांना गती देत आमदार अमोल खताळ यांनी आपल्या अवघ्या एका वर्षाच्या कार्यकाळात ८४८ कोटी ९७ लाख रुपयांचा अफाट निधी खेचून आणला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने मतदारसंघाच्या सर्वागीण विकासाचा नवा अध्याय त्यांनी सुरू केला आहे.

​ग्रामीण आणि शहरी दळणवळणावर भर

​ग्रामीण विकासाचा कणा असलेले रस्ते सुधारण्यासाठी आमदार खताळ यांनी ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजने'तून ४५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. यामुळे दुर्गम भागातील रस्त्यांचा प्रश्न सुटणार आहे. तसेच, शहरातील पायाभूत सुविधांसाठी २५ कोटींचा निधी देऊन नागरी व्यवस्था अधिक सक्षम केली आहे.

आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर मतदारसंघातील नागरिकांचे आरोग्य आणि शेतकऱ्यांच्या हाताला पाणी या दोन मूलभूत गरजांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. तालुक्याची आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी त्यांनी संगमनेर (घुलेवाडी) येथील ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर सुसज्ज उपजिल्हा रुग्णालयात करण्यासाठी शासनस्तरावर यशस्वी पाठपुरावा केला आहे. याशिवाय, महिला व बालकांसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्याचे त्यांचे नियोजन असून, यामुळे तालुक्यातील माता आणि बालकांना दर्जेदार आरोग्य सेवा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहेत.

​सिंचन क्षेत्राबाबत बोलायचे झाले तर, साकूर पठार भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी मुळा धरणाच्या बॅक वॉटरवर आधारित उपसा सिंचन योजना मंजूर करून घेण्यात आमदार खताळ यांना मोठे यश मिळाले आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेच्या सर्वेक्षणाचे काम वेगाने सुरू आहे. तसेच, भोजापूर डावा कालवा व पूरचारी यांच्या दुरुस्तीसाठी ४४ कोटींहून अधिक निधी खर्च करून शेतकऱ्यांच्या शेतीचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला आहे. मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार आणि गाळमुक्त धरण यांसारख्या योजना राबवून भूजल पातळी वाढवण्यावरही त्यांनी भर दिला आहे. आरोग्यदायी नागरिक आणि सुजलाम्-सुफलाम् शेती हाच खऱ्या अर्थाने मतदारसंघाच्या प्रगतीचा मंत्र असल्याचे या कामांतून अधोरेखित केले आहे.

औद्योगिक आणि सामाजिक क्रांती

​संगमनेरच्या औद्योगिक प्रगतीसाठी एमआयडीसीची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. तसेच, एसटी आगारात १० नवीन बसेस, अत्याधुनिक 'गुरखा' अग्निशमन वाहन आणि बांधकाम कामगारांसाठी ४ कोटी ५९ लाखांचे वाटप यांसारख्या ठोस कृतीतून त्यांनी आपली ओळख ‘कार्यसम्राट आमदार’ म्हणून निर्माण केली आहे.

​आमदार अमोल खताळ यांच्या कार्यपद्धतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा थेट जनसंपर्क. कोणत्याही मध्यस्थाशिवाय, पीए (PA) किंवा पुढाऱ्यांच्या शिफारशीशिवाय सामान्य नागरिक त्यांना थेट भेटून आपल्या अडचणी मांडू शकतात, ज्यामुळे प्रशासकीय कामात पारदर्शकता आणि विश्वासार्हता निर्माण झाली आहे. केवळ निधी आणणे इतकेच मर्यादित न राहता, त्यांनी विधिमंडळात जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे. यामध्ये तुकडाबंदी कायद्यातील अडचणी, जलजीवन मिशनमधील निकृष्ट कामांची चौकशी आणि अवैध धंद्यांविरुद्ध घेतलेली आक्रमक भूमिका यांचा समावेश आहे.

​मतदारसंघाच्या भविष्याचा विचार करून, पुणे-नाशिक रेल्वे मार्ग संगमनेरमधूनच जावा यासाठी त्यांनी घेतलेला ठाम निर्धार हा त्यांच्या दूरदृष्टीचा परिचय देतो. तसेच, शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे आणि सुरक्षेसाठी अत्याधुनिक अग्निशमन वाहन उपलब्ध करून देणे, यांसारख्या कामांतून त्यांनी नागरी सुविधांना नवे आयाम दिले आहेत. शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य नागरिक अशा सर्व स्तरातील लोकांच्या हितासाठी अहोरात्र झटणारे ‘लोकप्रिय आमदार’ म्हणून अमोल खताळ यांनी संगमनेरमध्ये विकासाचा नवा अध्याय खऱ्या अर्थाने सुरू केला आहे.

संगमनेर विधानसभा मतदारसंघात वर्षभरात प्राप्त निधी

👉 मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत २ कोटी १५ लाख
👉 ‘स्मार्ट अंगणवाडी’ एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत १ कोटी ३३ लाख
👉 मनरेगा अंतर्गत ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत/पाणंद रस्ते योजनेसाठी २१ कोटी ४० लाख
👉 भोजापूर डावा कालवा व पुर चारी दुरुस्ती व नूतनीकरण कामासाठी ४४ कोटी ४६ लाख
👉 महाराष्ट्र शासन कृषी विभाग योजना अंतर्गत लाभार्थ्याना १०१ कोटी ४१ लाख
👉 तालुक्यातील ४४ हजार १७० अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत ३१ कोटी ७१ लाख
👉 उर्ध्व प्रवरा प्रकल्प निळवंडे धरण डावा आणि उजवा कालवा कामासाठी ११० कोटी ९८ लाख
👉 मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत अटल भूजल योजना व जलयुक्त शिवार गाळमुक्त धरणासाठी ८ कोटी ३४ लाख
👉 संगमनेर शहरातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्था परीक्षेत्र अधिसूचित विशिष्ट नागरिक सेवा व सुविधा रस्ते विकास योजनेसाठी १६ कोटी ३ लाख ४० हजार १५०
👉 महावितरण सौर कृषी योजना, नवीन उपकेंद्र, वीज रोहित्र व वीज वाहिनीसाठी १७ कोटी १७ लाख
👉 आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत ६ कोटी ९० लाख
👉 मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ४५ कोटी
👉 पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत २५ लाख
👉 ग्रामपंचायतींना जन सुविधांसाठी विशेष अनुदान योजना ३ कोटी ९० लाख
👉 जिल्हा नियोजनातून ४ कोटी ८५ लाख
👉 जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) ३०५४ अंतर्गत ग्रामीण विकासासाठी १६ कोटी ८५ लाख
👉 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत २ कोटी
👉 वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत १ कोटी १९ लाख
👉 ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत १ कोटी ९ लाख
👉 नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान २ कोटी १० लाख
👉 प्रादेशिक पर्यटन विकास योजनेसाठी १ कोटी ८० लाख
👉 व्यायामशाळा विकास अनुदान योजना १ कोटी ५ लाख
👉 संगमनेर पंचायत समिती अंतर्गत विविध योजना लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजनेसाठी २८५ कोटी ४१ लाख
👉 आदिवासी विभाग अंतर्गत ठक्कर बाप्पा योजनांसाठी ४ कोटी १० लाख
👉 डिजिटल इंटरॅक्टिव्ह बोर्डासाठी १ कोटी ८९ लाख
👉 संगमनेर शहर आणि तालुक्यात हायमास्ट बसविण्यासाठी ६ कोटी ५४ लाख
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !