नामदार विखे पाटील यांच्या आश्वासनानंतर बोटा येथील 'रास्ता रोको' स्थगित!
◻️ नाशिक - पुणे रेल्वेसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणण्याची दिली ग्वाही
◻️ “आम्ही तुमच्या भूमिकेसोबतच“; पालकमंत्र्यांची आंदोलकांशी चर्चा
संगमनेर LIVE | महानगरपालिका निवडणुक झाल्यानंतर नाशिक - पुणे रेल्वे मार्गाच्या प्रश्ना संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून आणण्याचे आश्वासन जलसंपदा तथा पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्यानंतर बोटा येथील रास्तारोको आंदोलन स्थगित करण्यात आले.
नाशिक - पुणे रेल्वे मार्गाच्या प्रश्नासाठी पुणे - नाशिक महामार्गावर बोटा येथे संगमनेर अकोले तालुक्यातील नागरीकांनी रास्तारोको आंदोलन केले होते. आंदोलकांच्या मागण्या प्रांताधिकारी अरूण उंडे, पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी पालकमंत्र्यांशी संपर्क साधून कळवल्या होत्या.
पारनेर तालुक्याच्या दौऱ्यावर असलेले पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूरध्वनीवरून आंदोलनकर्त्याशी संपर्क साधला. मंत्री विखे पाटील यांनी आमदार किरण लहामटे, डाॅ. अजित नवले, सौ. निलम खताळ यांच्यासह सर्वानाच आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली.
महापालिकेची निवडणूक प्रक्रीया येत्या काही दिवसात संपणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची वेळ मिळू शकेल. दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा झाली. त्यांनीही भेटीसाठी वेळ देण्याचे मान्य केल्याने या प्रश्नावर भूमिका मांडता येईल असे सांगून मंत्री विखे पाटील यांनी आंदोलकांच्या भूमिके बरोबरोबच आपण असल्याची ग्वाही दिली.
आमदार डॉ. किरण लाहमटे, डाॅ. अजित नवले यांनी पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्याशी चर्चा करून आंदोलनातील भूमिका सांगितली. सर्वाच्या भावना समजून घेत मंत्री विखे पाटील यांनी केलेली विनंती मान्य करून रास्तारोको आंदोलन स्थगित करण्यात आले.