भोजापूर धरणातून कालव्याद्वारे रब्बीचे आवर्तन सुटले
◻️ मंत्री विखे पाटील व आमदार खताळ यांचे जलसंपदा विभागास निर्देश
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील पळसखेडे, निमोण, पिंपळे, सोनेवाडी आणि कऱ्हे या गावांतील शेतकऱ्यांनी रब्बीचे आवर्तन सोडण्याबाबत अर्जाद्वारे जलसंपदा विभाग नाशिक यांच्याकडे मागणी केली होती. त्यांच्या मागणीचा विचार करून भोजापूर धरणातून रब्बीचे आवर्तन वरील गावांसाठी कालव्याद्वारे सोडण्यात आले आहे. या आवर्तनाचा परिसरातील शेतकर्यांच्या रब्बी पिकांना फायदा होणार आहे.
रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली असल्याने भोजापूर मध्यम प्रकल्पातून आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी परिसरातील शेतकर्यांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली होती. या मागणीची तत्काळ दखल घेत आमदार खताळ यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेत रब्बीचे आवर्तन सोडण्याबाबत पत्रव्यवहार केला होता.
यानंतर मंत्री विखे पाटील यांनी शेतकर्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करत तत्काळ भोजापूर कालव्याद्वारे पाणी सोडण्याचे निर्देश जलसंपदा विभाग, नाशिक यांना दिले. त्यानुसार भोजापूर धरणातून रब्बीचे आवर्तन रविवारपासून सोडण्यात येत आहे. या निर्णयामुळे पळसखेडे निमोण, पिंपळे सोनेवाडी परिसरातील गहू, हरभरा, कांदा आदी रब्बी पिकांना दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान पाणी सोडण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने पुढाकार घेतल्याबद्दल परिसरातील शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच आमदार अमोल खताळ यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असताना, शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नाशिक जलसंपदा विभागाने हे आवर्तन नियोजनबद्ध, पारदर्शक आणि काटेकोरपणे राबवावे, कोणत्याही भागावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा स्पष्ट सूचना मंत्री विखे पाटील आणि आमदार खताळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.