“राजकारण सत्तेसाठी नाही, तर समाजविकासासाठी!” - माजी मंत्री बाळासाहेब थोरात
◻️ संगमनेरमध्ये सहकार महर्षी थोरात यांच्या जयंतीनिमित्त 'प्रेरणा दिन' उत्साहात साजरा
संगमनेर LIVE | वयाच्या १८ व्या वर्षी स्वातंत्र्ययुद्धात उडी घेऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोलाचे योगदान देणारे आणि स्वातंत्र्योत्तर काळात सहकाराच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या जीवनात समृद्धी निर्माण करणारे स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जीवनकार्य आजही समाजासाठी दीपस्तंभ आहे, असे गौरवोद्गार कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील ‘प्रेरणास्थळ’ येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. १२ जानेवारी हा दिवस संपूर्ण संगमनेर तालुक्यात ‘प्रेरणा दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी सहकारमहर्षीच्या आदर्शावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, दादांनी आयुष्यभर निष्ठा, शिस्त, काटकसर आणि स्वच्छ चारित्र्य या मूल्यांची जोपासना केली. त्यांचे संपूर्ण आयुष्य हे तत्त्वांच्या जपणुकीसाठी समर्पित होते. सामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी त्यांनी सहकाराचा आधार घेतला आणि राजकारण हे केवळ सत्तेचे साधन नसून ते समाजाच्या विकासासाठी असावे, हा महत्त्वाचा मंत्र सर्वांना दिला.
सहकार, शेती, शिक्षण आणि समाजकारण अशा विविध क्षेत्रांत त्यांनी दिलेले योगदान अद्वितीय आहे. त्यांच्याच दूरदृष्टीमुळे आणि विचारांच्या पायाभरणीमुळे आज संगमनेरचा सहकार देशात अग्रगण्य स्थानावर पोहोचला आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस आणि इंदिरा गांधी यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन ‘दंडकारण्य अभियान’ सुरू केले, ज्यातून पर्यावरण संवर्धनाची एक मोठी लोकचळवळ उभी राहिली.
“दादानी घालून दिलेल्या शिस्त आणि पारदर्शकतेच्या पायावरच आजच्या सहकाराची इमारत उभी आहे. त्यांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. असे शेवटी बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
दरम्यान सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त (प्रेरणा दिन) संगमनेर तालुक्यातील १७१ गावे आणि २५८ वाड्या-वस्त्यांवर विविध सामाजिक आणि विधायक उपक्रम राबवून त्यांना अभिवादन करण्यात आले. गावोगावी ग्रामस्थांनी उत्साहाने प्रभात फेऱ्या काढल्या आणि स्वच्छता अभियान राबवले. याचसोबत आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, वकृत्व आणि निबंध स्पर्धांच्या माध्यमातून लोकजागृती करण्यात आली.
तरुणाईला प्रोत्साहन देण्यासाठी 'सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रिकेट स्पर्धा' आणि विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, तर शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शने भरवण्यात आली होती. विविध सहकारी संस्था आणि शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात हा दिन साजरा करण्यात आला असून, संपूर्ण तालुका या निमित्ताने भाऊसाहेबांच्या स्मृतींनी भारून गेला होता.