२०३० पर्यत भारत जर्मनीला मागे टाकून तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल!

संगमनेर Live
0
२०३० पर्यत भारत जर्मनीला मागे टाकून तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल!

◻️ ​ओतूर डॉक्टर्स असोसिएशनतर्फे ‘नव्या युगाचे आर्थिक नियोजन’ विषयावर विशेष चर्चासत्र संपन्न


​संगमनेर LIVE | जागतिक स्तरावर युद्धजन्य परिस्थिती आणि अस्थिरता असतानाही भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत मजबूत स्थितीत असून, ती जगातील एक ‘रायझिंग स्टार’ ठरली आहे. २०२५ ते २०३० या कालावधीत भारत जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून नावारूपास येईल, असा ठाम विश्‍वास ओतूर डॉक्टर्स असोसिएशनने आयोजित केलेल्या विशेष मार्गदर्शन चर्चासत्रात व्यक्त करण्यात आला. 

नाशिक येथील आर्थिक विश्लेषक समीर नाईक आणि संगमनेरचे सुनील कडलग यांनी याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

​रविवारी सायंकाळी ओतूर (जि. पुणे) येथे आयोजित चर्चासत्राची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर डॉ. राहुल तांबे, डॉ. योगेश तांबे, डॉ. शशांक फापाळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओतूर डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अमित काशिद होते.

जागतिक पातळीवर भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत मजबूत झाल्याने भारत जगासाठी गुंतवणुकीचे केंद्र बनला आहे. ब्रिटन आणि जपानला मागे टाकत भारताने मोठी झेप घेतली असून, भविष्यात परदेशातील भारतीय बुद्धिमत्ता मायदेशातच करिअरसाठी स्थिरावेल, असा विश्‍वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

​समीर नाईक यांनी आधुनिक आर्थिक संकल्पना आणि आर्थिक शिस्तीचे महत्त्व विषद करताना सांगितले की, आधुनिक युगात गुंतवणुकीचे स्वरूप बदलत आहे. तर सुनील कडलग यांनी रुग्णांचे आरोग्य जपणाऱ्या डॉक्टरांना स्वतःच्या आर्थिक आरोग्यासाठी म्युचुअल फंड, जीवन विमा आणि आरोग्य विमा यांसारख्या साधनांचा वापर करण्याचा सल्ला दिला. वाढत्या महागाईच्या काळात पारंपारिक मुदत ठेवी आता अपुऱ्या ठरत असल्याने नव्या युगाचे आर्थिक व्यवस्थापन कसे असावे, याबद्दल त्यांनी महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या.

​याप्रसंगी असोसिएशनतर्फे आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत उपविजेतेपद पटकावल्याबद्दल डॉक्टरांच्या संघाला ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. तसेच डॉ. अमित काशिद यांनी येत्या २५ जानेवारी रोजी रथसप्तमी निमित्त ओतूर येथे ‘८ ते १०८ सूर्यनमस्कार’ या अभिनव आरोग्य उपक्रमाची घोषणा केली. यावेळी जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे मान्यवर आणि अनेक वैद्यकीय व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रोहिणी गायकर यांनी केले, तर डॉ. सोनल फापाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

​“वाढत्या महागाईला सामोरे जाण्यासाठी पारंपारिक गुंतवणुकीच्या पलिकडे जाऊन आधुनिक आर्थिक शिस्त लावणे ही काळाची गरज आहे.” असे मौलिक मार्गदर्शन आर्थिक सल्लागार सुनील कडलग यांनी केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !