राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या रणांगणात लोणीचे ‘कॅडेट्स’ अव्वल!

संगमनेर Live
0
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या रणांगणात लोणीचे ‘कॅडेट्स’ अव्वल!

◻️ राज्यभरातून सहभागी झालेल्या २२ शाळांमध्ये ठरले ‘नंबर वन’


संगमनेर LIVE (​लोणी) | ​कोपरगाव येथील के. सोमय्या समूहाच्या श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत लोणी येथील लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री डॉ. विखे पाटील सैनिकी स्कूलने देदीप्यमान यश संपादन केले आहे. 

राज्यातील विविध जिल्ह्यांतील एकूण २२ नामांकित शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता, ज्यामध्ये लोणीच्या सैनिकी स्कूलने प्रथम क्रमांक पटकावत स्पर्धेचे मानाचे सर्वसाधारण विजेतेपद आपल्या नावे केले असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य राजेश माघाडे यांनी दिली.

​या स्पर्धेत शाळेचे कॅडेट श्रेय गांधी आणि कॅडेट राजवर्धन पाटील यांनी आपल्या प्रभावी, ओघवत्या आणि अत्यंत विचारप्रवर्तक इंग्रजी भाषणांनी उपस्थितांची मने जिंकत संपूर्ण रंगमंच गाजवला. त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण आणि उत्कृष्ट सादरीकरणाचे परीक्षक तसेच रसिक प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक करण्यात आले. या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेला १० हजार रुपयांचे रोख बक्षीस आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशामागे स्पर्धा समन्वयक नीलिमा पाटील यांचे मार्गदर्शन आणि त्यांनी घेतलेले सातत्यपूर्ण प्रयत्न अत्यंत मोलाचे ठरले आहेत.

​विजेत्या स्पर्धकांच्या या घवघवीत यशाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे, डॉ. महेश खर्डे आणि कमांडंट कर्नल सुभाष घोडागेरी यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले आहे. तर, या यशामुळे प्रवरा परिवाराच्या शैक्षणिक गुणवत्तेचा वारसा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !