विखे पाटील महाविद्यालयात ४४ व्या राज्यस्तरीय रौप्य करंडक स्पर्धेचे आयोजन
◻️ लोणीत दिग्गज पाहुण्यांच्या उपस्थितीत रंगणार वैचारिक जुगलबंदीचा महासंग्राम!
संगमनेर LIVE (लोणी) | सहकार क्षेत्रातील अग्रणी संस्था असलेल्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या, पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये ‘सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालयीन रौप्य करंडक वादविवाद स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. १५ आणि शुक्रवार दि. १६ जानेवारी २०२६ रोजी ही स्पर्धा संपन्न होणार असल्याची माहिती उपप्राचार्य डॉ. आर. ए. पवार यांनी दिली.
महाराष्ट्रातील अत्यंत प्रतिष्ठेची आणि मानाची समजली जाणारी ही स्पर्धा यंदा आपल्या गौरवशाली ४४ व्या वर्षात पदार्पण करत आहे. यावर्षी संयोजन समितीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मानवी जीवनाच्या सर्वांगीण विकासास पूरक ठरेल’ हा अत्यंत समकालीन आणि जिव्हाळ्याचा विषय वाद-विवादासाठी निवडला आहे, अशी माहिती स्पर्धेचे कार्याध्यक्ष डॉ. शांताराम चौधरी यांनी दिली.
स्पर्धेच्या आयोजनाबाबत अधिक माहिती देताना संयोजन समितीने सांगितले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यभरातून स्पर्धक मोठ्या संख्येने हजेरी लावणार आहेत. या स्पर्धेसाठी वरिष्ठ आणि कनिष्ठ गटात एकत्रित मिळून २५ हजार रुपयांची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली असून, गुणानुक्रमे पहिल्या दहा क्रमांकांच्या संघांना महाविद्यालयाकडून एका बाजूचा प्रवास खर्चही प्रदान केला जाणार आहे. विशेष म्हणजे, बाहेरगावावरून येणाऱ्या स्पर्धकांसाठी निवास आणि भोजनाची मोफत सोय महाविद्यालयाने केली असून, सहभागी स्पर्धकांना गुरुवारी सायंकाळी शिर्डी येथे साई दर्शनाची विशेष सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ गुरुवारी सकाळी १० वाजता अकोले येथील अगस्ती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडेल.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार दि. १६ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता भेंडा येथील जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे यांच्या हस्ते संपन्न होईल. याप्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील हे अध्यक्षस्थान भूषविणार असून संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांची विशेष उपस्थिती राहणार आहेत.
दरम्यान या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे सदस्य डॉ. बाबासाहेब वाणी, डॉ. कल्पना पलघडमल, डॉ. विजय खर्डे, प्रा. विजय खाडे आणि डॉ. मनोज पाटील हे विशेष परिश्रम घेत आहेत. राज्यभरातील जास्तीत जास्त महाविद्यालयांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.