मतदारसंघातील एकही गाव पाण्यापासून वंचित ठेवणार नाही - आमदार अमोल खताळ
◻️ निळवंडे कालव्याच्या कामाचा घुलेवाडी येथे घेतला आढावा
संगमनेर LIVE | निळवंडे धरणाच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही कालव्यांमुळे अनेक गावांचा पिण्याचा आणि शेतीचा प्रश्न मार्गी लागत असून, यापूर्वी पाण्यापासून वंचित राहिलेल्या गावांचाही जलसंपदा विभागाच्या वतीने सर्वे करून त्या गावांनाही लवकरच पाणी मिळवून दिले जाईल. जलसंपदा विभागाच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून संगमनेर मतदारसंघातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही, असा ठाम विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे.
घुलेवाडी येथील निळवंडे कालवा विभागाच्या कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
आमदार खताळ यांनी यावेळी सांगितले की, पूर्वीच्या काळी निळवंडे, भोजापूर व आढळा परिसरातील जी गावे या योजनेतून वगळली गेली होती, त्यांना आता न्याय दिला जात आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे विभागाची जबाबदारी आल्यानंतर निळवंडे कालव्यातून तीन टीएमसीपर्यंत पाणी वाहत असून सर्वत्र पाणी उपलब्ध होत आहे.
विशेषतः राजकीय द्वेषातून पाण्यापासून कायमच वंचित राहिलेल्या मालदाड, सायखिंडी, कऱ्हे, मेंढवण आणि वेल्हाळे या गावांना आता पाणी मिळाले असून, हे पुण्य आम्हाला लाभत असल्याचे त्यांनी नमूद केले. यासोबतच चंदनापुरी, हिवरगाव पावसा, सावरगाव, डिग्रस, कोळवाडे, मालुंजे, शिरापूर आणि चिंचोली गुरव या भागांचा सर्वे पूर्ण झाला असून, निमगाव पागा व सावरचोळ परिसराचाही सर्वे करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. केवळ कागदोपत्री सर्वे न करता प्रत्यक्ष पाणी देण्याचे काम शासन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीपूर्वी काही मर्यादा होत्या, मात्र आता अधिकार प्राप्त झाल्याने कामांना गती मिळाली असून जलसंधारण विभागाची प्रलंबित कामेही लवकरच पूर्ण केली जातील. महायुती सरकार हे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नवीन पाणीपुरवठा कामांचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
या बैठकीला शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, तालुकाध्यक्ष रामभाऊ रहाणे, राजेंद्र सोनवणे, भाजप तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, श्रीकांत गोमासे, अभियंता सेलचे जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र चकोर, अमित नवले, कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे, अमोल कवडे यांच्यासह संदीप घुगे, अशोक खेमनार, ॲड. संदीप जगनर, साहेबराव वळवे, सागर कानवडे व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान बैठकीत आलेल्या विविध सूचनांची दखल घेत जलसंपदा विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून सकारात्मक निर्णय घेतील, असे आश्वासनही यावेळी देण्यात आले.