आमदार अमोल खताळ यांच्या पुढाकारातून १८०० पाणंद रस्ते होणार चकाचक!
◻️ महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत निर्देश
संगमनेर LIVE | राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते अभियाना’ची प्रभावी अंमलबजावणी आता संगमनेर विधानसभा मतदारसंघात होणार आहे. या अभियानांतर्गत तालुक्यातील सुमारे १८०० पाणंद रस्ते विकसित करण्यात येणार असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.
शुक्रवारी (दि. १६) प्रांतधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आमदार खताळ यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीला प्रांताधिकारी अरुण उंडे, पोलीस उपधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, तहसीलदार धीरज मांजरे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, शेतकऱ्यांची सोय हाच मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवण्यात आला आहे. शेतीमालाची ने-आण आणि शेती उपयोगी अवजारांची वाहतूक सुलभ व्हावी यासाठी पहिल्या टप्प्यात २५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे मजबुतीकरण केले जाणार आहे. या प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून भूमी अभिलेख विभागामार्फत रस्त्यांची तात्काळ मोजणी केली जाईल. विशेष म्हणजे, या कामासाठी लागणारे सर्व गौण खनिज शासनाकडून मोफत उपलब्ध करून दिले जाणार असून, रस्ते तयार करताना काही वाद उद्भवल्यास प्रशासनाकडून निशुल्क पोलीस बंदोबस्तही पुरवण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील दळणवळण अधिक वेगवान होणार आहे.
प्रशासकीय समन्वय आणि नियोजनाबाबत बोलताना आमदार खताळ यांनी स्पष्ट केले की, या अभियानाच्या यशस्वीतेसाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष म्हणून स्थानिक आमदार काम पाहत असून प्रांताधिकारी हे मानद सचिव म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग या सर्व कामांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणार आहे.
“शेतकऱ्यांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या समस्या या अभियानामुळे कायमस्वरूपी सुटणार आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरच्या शेती विकासाला यामुळे मोठी चालना मिळेल,” असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी यावेळी व्यक्त केला.
या बैठकीस सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार, विशाल ताम्हाणे यांसह महसूल, पोलीस आणि बांधकाम विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोहिमेमुळे तालुक्यातील १७०० हून अधिक रस्त्यांचे प्रश्न सुटणार असल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.