बारामतीचा राजकीय ‘सातबारा’ पुन्हा शरद पवार यांच्याकडे?

संगमनेर Live
0
बारामतीचा राजकीय ‘सातबारा’ पुन्हा शरद पवार यांच्याकडे?

◻️ पत्रकार परिषदेनतंर महाराष्ट्राच्या राजकारणात बारामतीपासून दिल्लीपर्यंत कंप


संगमनेर LIVE | ​राजकारणात शब्दांपेक्षा, न बोलता दिलेल्या संदेशांची ताकद जास्त असते, याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा महाराष्ट्राला आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज सकाळी दिलेल्या एका मुलाखतीतून एकाच वेळी अनेक राजकीय समीकरणांचा सोक्षमोक्ष लावला आहे. “एका दगडात दोन पक्षी” मारण्याची कला काय असते, याचा वस्तुपाठच त्यांनी आजच्या आणि उद्याच्या पिढीतील राजकारण्यांना घालून दिला आहे.
‘मला कल्पना नाही’ साधे वाक्य, पण मोठा संदेश

​“शपथविधी होणार हे मला माहित नाही,” असे सांगून शरद पवारांनी पहिल्याच चेंडूवर स्वतःला या संपूर्ण सत्तानाट्यापासून वेगळे केले आहे. या विधानाद्वारे त्यांनी स्पष्ट केले की, सध्याच्या बंडखोरीच्या किंवा सत्तेच्या खेळात माझा कोणताही हात नाही. यामुळे संभ्रमात असलेल्या कार्यकर्त्याना त्यांनी स्पष्ट दिशा दिली.

​पवारांनी अतिशय शिताफीने या बंडाचे खापर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर फोडले. “हे सर्व त्यांनीच घडवून आणले,” असे सूचित करून पवारांनी या दोघांनाही जनतेसमोर आणि पक्षात ‘एक्सपोज’ केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यामुळे बंडाचे शिल्पकार अजित पवार नसून, त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पटेल आणि तटकरे स्वतःचे राजकारण करत आहेत, हा संदेश गेला आहे.

विलीनीकरणाची भीती आणि भाजपचा दबाव?

​“एवढ्या घाईने शपथविधी का उरकला, हे मला माहित नाही,” असे सांगून पवारांनी या घाईगडबडीमागचे खरे कारण उलगडले. १२ तारखेला पक्षाचे विलीनीकरण होणार होते, अशी माहिती देऊन त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला. याचा अर्थ स्पष्ट आहे. भाजप, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांना राष्ट्रवादीचे हे नियोजित विलीनीकरण नको होते. ते या विलीनीकरणाला घाबरले होते, म्हणूनच त्यांनी ही खेळी खेळली, हे पवारांनी जनतेच्या मनावर बिंबवल्याचे स्पष्ट झाले.

‘दादा' म्हणजे आम्हीच!

​१२ तारखेच्या नियोजित विलीनीकरणाचा उल्लेख करून पवारांनी एक भावनिक आणि राजकीय मास्टरस्ट्रोक मारला आहे. “दादांचा पक्ष सध्या जे वागत आहे, ते दादांच्या अंतिम इच्छेविरूद्ध आहे,” असा संदेश त्यांनी अजितदादांच्या गटातील सामान्य कार्यकर्त्याना दिला आहे. अजितदादांचे खरे वारसदार आणि विचारांचे वाहक हे पटेल-तटकरे नसून, आम्हीच (मूळ राष्ट्रवादी) आहोत, हे त्यांनी अधोरेखित केले.

​पवार कुटुंबाची एकजूट आणि सुनेत्रा वहिनी

​“अस्थी विसर्जनानंतर सुनेत्रा वहिनींचा कुटुंबाशी संवाद झालेला नाही,” या एका वाक्यातून पवारांनी हे स्पष्ट केले की, अजितदादांच्या गटाने घेतलेल्या निर्णयामध्ये उर्वरित पवार कुटुंब सामील नाही. पवार घराणे या सत्तेच्या राजकारणापासून अलिप्त असून, हा निर्णय पूर्णपणे वैयक्तिक आणि काही विशिष्ट नेत्यांचा आहे, हे त्यांनी स्पष्ट केले.

​बारामतीचा ‘सातबारा' परत घेतला?

​या पत्रकार परिषदेपूर्वी, काल पवारांनी बारामतीत जाऊन नीरा नदीची पाहणी केली. वरकरणी हा दौरा साधा वाटत असला तरी त्यामागे एक प्रचंड मोठा प्रतिकात्मक अर्थ दडलेला आहे. राजकीय जाणकारांच्या मते, “बारामतीचा राजकीय सातबारा मी अजितदादांच्या नावे केला होता, पण आता अजितदादा आपल्यात नाहीत, तेव्हा मूळ मालकाने (शरद पवार) तो सातबारा पुन्हा स्वतःच्या नावावर घेतला आहे,” हा खणखणीत इशाराच त्यांनी या पाहणी दौऱ्यातून दिला आहे.

पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे नाव घेऊन अप्रत्यक्षपणे या बंडाचे धागेदोरे दिल्लीत (भाजप हायकमांड) असल्याचे सूचित केले आहे. महाराष्ट्रातील हे सत्तानाट्य स्थानिक नसून दिल्लीश्वरांच्या इशाऱ्यावर नाचत असल्याचे त्यांनी अधोरेखित केल्याचे मत राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे शरद पवारांनी कार्यकर्त्यामधील संभ्रम दूर केला आणि बारामतीवरील आपली पकड पुन्हा घट्ट करण्यासाठी पाऊल टाकण्यास सुरुवात केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

दरम्यान या पत्रकार परिषदेनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गोविंद बागेतील निवासस्थानी खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, युगेद्र पवार आदिच्या उपस्थितीत राजकीय खलबते सुरू होती. त्याचंवेळी त्याठिकाणी पार्थ पवार देखील दाखल झाले होते. मात्र, त्यांच्यामध्ये नेमकी काय? चर्चा झाली हे बाहेर न येऊ शकलेली नाही. 

तर, ज्येष्ठ नेते शरद पवार हे सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती आमदार रोहित पवार इशाऱ्याद्वारे दिल्यामुळे पवार कुटुंबात सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !