◻️ वरदविनायक सेवाधाममध्ये गणेशयाग महोत्सवाच्या मंगलमय सोहळ्याला प्रारंभ
संगमनेर LIVE (लोणी) | “भगवंताच्या आशीर्वादाने जीवनामध्ये कोणतीच गोष्ट कमी पडत नाही. राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करत असताना अध्यात्मिक सेवा कार्य नेहमीच नवी ऊर्जा देत असते. एकेकाळी ज्या भागातून जाताना भीती वाटत होती, त्या माळरानावर उद्धव महाराजांनी ‘वरदविनायक सेवाधाम’ची स्थापना करून भक्तीचे नंदनवन फुलवले आहे,” असे गौरवद्गार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी काढले.
लोणी येथील श्री क्षेत्र वरदविनायक सेवाधाम येथे श्री गणेश जयंतीनिमित्त आयोजित चतुर्थदिनी भजन, कीर्तन व संकल्पपूर्ती गणेशयाग महोत्सवाचे उद्घाटन सौ. शालिनीताई विखे पाटील आणि माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
सौ. शालिनीताई विखे पुढे म्हणाल्या की, वारकरी संप्रदायातील उद्धव महाराजांचे कार्य सर्वसमावेशक आहे. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन धर्मकार्याची उंची वाढवली आहे. दान देणाऱ्यापेक्षा ते घेणारा आणि त्याचा विनियोग करणारा महत्त्वाचा असतो. महाराजांनी समाजाकडून आलेल्या दानाचा अत्यंत योग्य वापर केल्याचे पाहून मनस्वी समाधान वाटते. असे गौरवोद्गार काढले.
पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी सुरू केलेले सेवाधामचे कार्य विखे पाटील परिवाराने निरंतर सुरू ठेवले आहे. आगामी काळातही सेवाधामच्या भौतिक विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी सौ. विखे यांनी दिली.
माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांनी देखील आपले विचार मांडले. ते म्हणाले, “वरदविनायक सेवाधामच्या माध्यमातून लोणी परिसरात एक मोठे धार्मिक अधिष्ठान निर्माण झाले आहे. मानवी जीवनात सुख - समाधान लाभावे यासाठी परमार्थ आवश्यक असून, उद्धव महाराजांच्या कार्यात सातत्य आणि अभिमान वाटावा अशी प्रगती आहे.” असे म्हटले.
महंत उद्धव महाराज म्हणाले की, या सेवाधामच्या पायाभरणीची सुरुवात डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी केली होती. त्यानंतर नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी शासकीय निधी व वैयक्तिक लक्ष घालून मोठे योगदान दिले आहे. भाविकांचा भक्तीभाव आणि संतांच्या कृपेमुळेच ही अध्यात्मिक भरभराट होत असल्याचे नमूद केले.
दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक बाळासाहेब झिने यांनी केले, तर भारत महाराज धावणे यांनी स्वागत व आभार मानले. याप्रसंगी महंत रमेशानंदगिरी महाराज, भारत महाराज धावणे, संतसेवक कचरू निर्मळ यांसह मोठ्या संख्येने भाविक या सोहळ्याला उपस्थित होते.