आश्वी परिसरात अजित पवार यांच्या निधनानंतर कडकडीत बंद
◻️ व्यापारी, व्यावसायिकांकडून श्रद्धांजली; सोशल मीडियावर शोकसंवेदनांचा पूर
संगमनेर LIVE | महाराष्ट्राच्या राजकारणातील फायर ब्रॅड नेते म्हणून ओळखले जाणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे भीषण विमान अपघातात बुधवारी (दि. २८) सकाळी निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संगमनेर तालुक्यातील आश्वी आणि परिसरातील गावांमध्ये शोककळा पसरली असून, स्वयंस्फूर्तीने आश्वी बुद्रुक बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली आहे.
अजितदादांच्या निधनाचे वृत्त समजताच आश्वीसह परिसरातील ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. सकाळपासूनच व्यापारी आणि व्यावसायिकांनी आपली दुकाने आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने स्वतःहून बंद ठेवून आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली. एरवी गजबजणाऱ्या बाजारपेठेत आज सन्नाटा पसरला असून, केवळ दादांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.
अतिशय शिस्तप्रिय आणि कामाचा झपाटा असलेल्या या नेत्याचे असे अचानक जाणे सर्वसामान्यांच्या मनाला चटका लावून गेले आहे. “दादा आता आपल्यात नाहीत, या बातमीवर विश्वासच बसत नाहीये,” अशा भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केल्या. परिसरात ठिकठिकाणी लोक समूहाने उभे राहून या घटनेबद्दल हळहळ व्यक्त करताना दिसत होते.
केवळ प्रत्यक्ष व्यवहारातच नव्हे, तर डिजिटल विश्वातही अजितदादांच्या निधनाचे पडसाद उमटले आहेत. सोशल मीडियातील फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम अशा विविध माध्यमांतून सकाळपासूनच श्रद्धांजलीच्या पोस्टचा पाऊस पडत आहे. कार्यकर्ते आपल्या लाडक्या ‘दादां’चे फोटो आणि त्यांच्या कामाच्या आठवणी शेअर करत त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहत आहेत.
दरम्यान रयत शिक्षण संस्थेच्या अश्वी इंग्लिश स्कूलला दुपारनंतर सुट्टी देण्यात आली होती. तसेच मुख्य बाजारपेठ असलेल्या आश्वी बुद्रुक सह परिसरातील लगतच्या गावांमधील सर्व शासकीय आणि निमशासकीय कामांवरही या घटनेचा परिणाम दिसून आला. एकूणच परिसरात अत्यंत गंभीर आणि शोकाकुल वातावरण असून, एका कर्तृत्ववान नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला असल्याची भावना सर्व सामान्य नागरिक व्यक्त करत आहे. तसेच शोकभावना व्यक्त करणाऱ्यांमध्ये महिलांचा अर्थात लाडक्या बहिणीचा देखील लक्षणीय सहभाग दिसून येते आहे. तर, बॅका आणि वैद्यकीय सेवा मात्र, सुरळीत सुरू आहेत.