प्रवरा मेडिकल ट्रस्टमुळे सातासमुद्रापार पोहचला ‘मकर संक्रांती’चा गोडवा!
◻️ सुवर्णाताई विखे पाटील यांच्या उपस्थितीत ‘हळदी-कुंकू’ उत्साहात संपन्न
संगमनेर LIVE (लोणी) | प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या वतीने मकर संक्रांतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला ‘तीळगुळ आणि हळदी-कुंकू’ समारंभ लोणी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. महिला कर्मचाऱ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमाचे हे सलग सहावे यशस्वी वर्ष ठरले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना विश्वस्त सौ. सुवर्णाताई विखे पाटील यांनी महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि विद्यापीठातील सर्व स्तरांतील महिला कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधता यावा, यासाठी हा सोहळा आयोजित केला जातो. यामुळे आम्हाला एकमेकांच्या जवळ येता येते. कामाच्या व्यापातून वेळ काढून महिलांना त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण करता यावे, यासाठी हे व्यासपीठ आम्ही कायम उपलब्ध करून देऊ.” अशी ग्वाही दिली.
संस्थेतील महिला कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याची रंगत वाढवली. शिस्तबद्ध समूह नृत्य आणि सुरेल गायनाने उपस्थितांची मने जिंकली. केवळ आरोग्य सेवाच नव्हे, तर कलेच्या क्षेत्रातही प्रवरातील महिला अग्रेसर असल्याचे या माध्यमातून पुन्हा एकदा सिद्ध झाले.
या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे अमेरिकेतील ड्रेक विद्यापीठाच्या सहा आंतरराष्ट्रीय विद्यार्थिनींची उपस्थिती. डॉ. रॅचेल मॅकहग यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या या विद्यार्थिनींनी पारंपरिक भारतीय वेशभूषेत या सोहळ्याचा आनंद लुटला. हळदी-कुंकू आणि 'वाण' वाटपाची भारतीय परंपरा पाहून या परदेशी विद्यार्थिनी भारावून गेल्या होत्या.
याप्रसंगी व्यासपीठावर सुवर्णा जोंधळे, उज्ज्वला कवडे, शुभा महाजन, स्वरूपा गावडे, डॉ. शुभांगी म्हस्के-मणी, अलका जगदाळे यांच्यासह प्रवरा परिवारातील अनेक मान्यवर महिला उपस्थित होत्या.
दरम्यान कार्यक्रमाच्या उत्तरार्धात उपस्थित सर्व महिलांना सौ. सुवर्णाताई विखे पाटील यांच्या हस्ते पारंपरिक वाणाचे वाटप करण्यात आले. या सोहळ्यासाठी प्रवरा परिवारातील महिला अधिकारी आणि सुमारे १३०० महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.