स्वप्नांना कृतीची जोड देऊन यशस्वी उद्योजक व्हा! - शरद तांदळे

संगमनेर Live
0
स्वप्नांना कृतीची जोड देऊन यशस्वी उद्योजक व्हा! - शरद तांदळे

◻️ ​लोणी येथे पद्मश्री विखे पाटील व्याख्यानमालेत ‘तरुणांनो उद्योजक व्हा’ विषयावर दुसरे पुष्प गुंफले


संगमनेर LIVE (​लोणी) | “बदलत्या युगामध्ये आपले ध्येय साध्य करण्यासाठी केवळ स्वप्न पाहू नका, तर त्या स्वप्नांना ज्ञान, कौशल्य आणि सकारात्मक कृतीची जोड देऊन व्यावसायिक दृष्टिकोन जपा. समाजाचा विचार करण्यापेक्षा आपल्या मनाचा आवाज ऐका आणि आत्मविश्वासाने उद्योजकता क्षेत्रात पाऊल टाका. कष्ट आणि नवनवीन माहितीच्या जोरावर आपण नक्कीच यशस्वी उद्योजक होऊ शकतो,” असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक आणि उद्योजक शरद तांदळे यांनी केले.

​लोणी येथे पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ‘सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील स्मृती व्याख्यानमालेच्या’ २५ व्या वर्षातील दुसरे पुष्प ‘तरुणांनो उद्योजक व्हा’ या विषयावर आयोजित करण्यात आले होते. 

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, भारत घोगरे, डॉ. प्रदीप दिघे, सौ. लीलावती आहेर, डॉ. महेश खर्डे, डॉ. आर. ए. पवार यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

​यावेळी मार्गदर्शन करताना शरद तांदळे म्हणाले की, सध्याचे युग हे अत्यंत वेगवान असून तरुणांनी आपले ध्येय शोधून त्यात आनंद मिळवण्यासाठी स्वतःची क्षमता वाढवणे गरजेचे आहे. आपली मनस्थिती हीच आपली परिस्थिती घडवत असते, त्यामुळे सकारात्मक विचारातून आणि देहबोलीत बदल करून नेहमी उत्साही राहावे.

उद्योजकतेचे स्वप्न पाहताना केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष कृतीवर भर द्यावा, कारण हीच कृती आपल्याला यशापर्यंत पोहोचवत असते. विद्यार्थ्यांनी महापुरुषांची चरित्रे आणि चांगली पुस्तके वाचून स्वतःला समृद्ध करावे. विशेषतः पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी कष्टाने उभे केलेले सहकाराचे नंदनवन हे आजच्या पिढीसाठी मोठी प्रेरणा आहे. हा काळ सुवर्णकाळ असून तो निराशेत न घालवता छोट्या व्यवसायापासून सुरुवात केल्यास त्याचे रूपांतर भविष्यात नक्कीच मोठ्या उद्योगात होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

​या प्रसंगी तांदळे यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्याना शालेय शिक्षणासोबतच उद्योजकतेचे धडे दिले जात आहेत. ‘प्रवरा बिल्डिंग एक्सपो’ सारख्या उपक्रमातून झालेली आर्थिक उलाढाल ही येथील उद्योजकता खऱ्या अर्थाने वाढीस लागल्याचे उत्तम उदाहरण आहे.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ. अनुश्री खैरे यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. शांताराम चौधरी यांनी केले, तर आभार प्राचार्या सौ. विद्या घोरपडे यांनी मानले.

दरम्यान ​व्याख्यानमालेतील पुढील तिसरे पुष्प शनिवार, दि. २४ जानेवारी रोजी गुंफले जाणार असून, यावेळी पुणे येथील प्रसिद्ध निरूपणकार चैतन्य महाराज वाडेकर ‘युवा संवाद: आजची तरुणाई आणि समाज व्यवस्था’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !