पानोडीत दोन बंद घरे फोडून लाखों रुपयांचा ऐवज लंपास!

संगमनेर Live
0
पानोडीत दोन बंद घरे फोडून लाखों रुपयांचा ऐवज लंपास!

◻️ ​सोन्याच्या दागिन्यांसह रोख रकमेवर चोरट्यांचा डल्ला


संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील पानोडी शिवारातील हजारवाडी येथील कोळेकर वस्तीवर शुक्रवारी (दि. १६) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दोन बंद घरांचे कुलूप तोडून मोठी चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या धाडसी चोरीत सहा तोळे सोन्याचे दागिने आणि सुमारे ७० हजार रुपयांची रोख रक्कमेसह लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याने पंचक्रोशीत मोठी खळबळ उडाली आहे.

​हजारवाडी येथील कोळेकर वस्तीवरील रहिवासी अनिल देवराम कोळेकर आणि कारभारी कृष्णा कोळेकर हे दोघेही मेंढीपालन व्यवसाय करतात. शुक्रवारी आपल्या व्यवसायानिमित्त ते मेंढ्यांकडे गेले असल्याने घरांना बाहेरून कुलूप होते. हीच संधी साधून चोरट्यांनी धाडसाने घरांचे दरवाजे उघडले आणि चोरी केली.

यावेळी चोरट्यांनी अनिल कोळेकर यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटांची उचकापाचक केली. त्यातून २० हजार रुपये रोख आणि आडीज ते तीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले.

तसेच कारभारी कोळेकर यांच्या घरातून ३ तोळे सोन्याचे दागिने आणि कपाटात डब्यात ठेवलेले ५० हजार रुपये चोरट्यांनी चोरले. विशेष म्हणजे, ही ५० हजार रुपयांची रक्कम त्यांनी ‘घरकुल’ बांधण्यासाठी म्हणून जमा करून ठेवली होती, त्यावरही चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

​शनिवारी सकाळी प्रशांत कोळेकर आणि दगडू कोळेकर यांनी घरात प्रवेश केला असता कपाटांमधील सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळले. त्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यकर्ते भारत शेवाळे यांना माहिती दिली. शेवाळे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने आश्‍वी पोलीस ठाण्याला ही माहिती कळवली. त्यामुळे पोलीसांनी घटनास्थळी येऊन पाहणी करत पंचनामा केला आहे. तर, सायंकाळी उशिरा ‘डॉग स्कॉड’ घटनास्थळी दाखल झाले आहे.

दरम्यान ​या घटनेमुळे पानोडी आणि परिसरात भीतीचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, यापूर्वीही परिसरात कृषि पंप, शेतीचे साहित्य आणि किरकोळ चोऱ्या झाल्या आहेत, मात्र अद्याप चोरीच्या घटनांचा तपास लागलेला नाही. आता थेट लाखोंचा ऐवज चोरी गेल्याने पोलीसांनी या चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तर, अज्ञात चोरट्यांविरुद्ध आश्‍वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

चोरीच्या घटनेमुळे कोळेकर कुटुंब मानसिक धक्क्यात आहे. मात्र, पोलीसांनी चोरीला गेलेल्या दागिन्यांच्या ‘पक्का बिलांची’ मागणी केल्यामुळे पेच निर्माण झाला आहे. अनेक वर्षापूर्वीचे आणि वडिलोपार्जित दागिन्यांची बिले उपलब्ध होणे अशक्य आहे, त्यामुळे ही अट शिथिल करावी. तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीसांनी गावात गस्त वाढवावी आणि ग्रामपंचायतीने देखील गावात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी. अशी मागणी पानोडी येथील सामाजिक कार्यकर्ते भारत शेवाळे यांनी केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !