जलजीवन आणि घरकुल योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करा
◻️ पंचायत समिती आढावा बैठकीत आमदार अमोल खताळ यांचे निर्देश
◻️ कामं कागदावर नको, प्रत्यक्षात दिसली पाहिजेत; त्रुटी आढळल्यास गय करणार नाही
संगमनेर LIVE | “ग्रामीण भागातील जनतेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. जलजीवन आणि घरकुल यांसारख्या योजना लोकांच्या जीवनाशी निगडित आहेत. त्यामुळे केवळ कागदोपत्री ‘प्रगती'दाखवू नका, तर प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करा. जर कामात दर्जा नसेल किंवा त्रुटी आढळल्या, तर त्यावर कडक कारवाई केली जाईल,” अशा स्पष्ट शब्दांत आमदार अमोल खताळ यांनी प्रशासनाला खडसावले.
संगमनेर पंचायत समिती येथे आयोजित विविध विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
बैठकीत जलजीवन मिशन आणि घरकुल योजनेच्या अंमलबजावणीवर आमदारांनी विशेष भर दिला. महायुती सरकारच्या माध्यमातून ही योजना कार्यान्वित झाली असली, तरी कामांच्या दर्जाबाबत अद्यापही तक्रारी येत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात न बसता प्रत्यक्ष फील्डवर जाऊन कामाची पाहणी करावी आणि महिनाभराच्या आत सर्व कामांचा सविस्तर अहवाल सादर करावा, असे आदेश त्यांनी दिले. तसेच, घरकुल योजनेच्या लाभार्थ्याना वेळेत लाभ मिळवून देऊन आपला तालुका या महत्त्वाकांक्षी योजनेत मागे पडणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
रस्त्यांच्या कामांबाबत बोलताना आमदार खताळ यांनी कडक भूमिका घेतली. रस्त्यांच्या कामात ठेकेदारीपेक्षा गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. अवघ्या सहा महिन्यांत रस्ते खराब होणे ही शासनाच्या प्रतिमेची हानी असून, जनतेच्या निधीचा वापर हा दर्जेदार कामांसाठीच झाला पाहिजे, असा इशारा त्यांनी दिला.
यासोबतच प्रशासकीय संवेदनशीलता जपण्याचे आवाहन करताना ते म्हणाले की, नागरिक जेव्हा वारंवार तक्रारी करतात, तेव्हा त्यात निश्चितच तथ्य असते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन कामे करावीत आणि जनतेशी अत्यंत सौजन्याने वागावे. जर कामात कोणाकडून अडवणूक होत असेल, तर त्याची माहिती थेट माझ्यापर्यंत पोहोचवावी, असेही त्यांनी नमूद केले.
आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई आणि शासकीय सवलतींबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. टंचाईच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून टॅकर नियोजनाची तयारी आत्तापासूनच करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
याशिवाय, घरकुल लाभार्थ्याना शासनाकडून पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करून लाभार्थ्याना केवळ वाहतुकीचा खर्च द्यावा लागेल, याची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या बैठकीत आरोग्य, शिक्षण, कृषी आणि 'उमेद' बचत गट यांसारख्या विविध विभागांतील तक्रारींचीही त्यांनी दखल घेतली. तसेच “यापुढे प्रत्येक महिन्याला आढावा बैठक घेतली जाईल. वेळ पडल्यास मी स्वतः तुमच्यासोबत फील्डवर येऊन कामाची पाहणी करेन, हे लक्षात ठेवा.” अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.
दरम्यान या बैठकीसाठी गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, भाजपचे भीमराज चत्तर, शिवसेनेचे रामभाऊ राहाणे, राजेंद्र सोनवणे, गुलाब भोसले, गोकुळ दिघे, श्रीकांत गोमासे, अमित नवले, रिपाइंचे आशिष शेळके, रणजीत ढेरंगे, रोहिदास गुंजाळ, अशोक खेमनर, सूर्यभान नवले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.